
मोबाइल चोरीला लगाम .लोणावळा पोलिसांची कारवाई, ३५ हरवलेले फोन मूळ मालकांच्या ताब्यात
लोणावळा : शहर व परिसरात वाढत्या मोबाइल चोरीच्या घटनांना आळा घालत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी साधली आहे. विविध ठिकाणी हरवलेले व चोरीला गेलेले असे एकूण ३५ मोबाइल फोन शोधून त्यांना त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. हरवलेला मोबाइल परत मिळण्याची आशा नागरिकांना सहसा नसते. मात्र पोलिसांनी केलेल्या जलद व तांत्रिक तपासामुळे अनेकांना सुखद धक्का बसला.

गर्दीच्या ठिकाणी मोबाइल फोन चोरीला जाणे किंवा गहाळ होणे या तक्रारींमध्ये अलीकडेच वाढ झाली होती. फोन हरवल्यानंतर नागरिकांचे दैनंदिन व्यवहार, आर्थिक अडचणी तसेच वैयक्तिक माहितीचा धोका वाढत होता. या सर्व परिस्थितीला प्रतिसाद देत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तक्रारींवर तातडीने कारवाई सुरू केली.


मोबाइल गहाळ झाल्याच्या तक्रारी नोंदवल्यानंतर तांत्रिक तपास, सीडीआर विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि सातत्यपूर्ण पाळत यामुळे अनेक फोन सापडले. काही मोबाईल दुसऱ्या सिमकार्डसह वापरले जात असल्याचेही उघड झाले. त्यानंतर राज्याच्या विविध भागांतून हे फोन जप्त करून लोणावळ्यात आणण्यात आले.


उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे आणि लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आपल्या हातात हरवलेला मोबाइल परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या या कार्याची प्रशंसा केली आहे.


प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























