राजे उमाजी नाईक यांची जयंती मावळ तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्याचे तहसीलदारांचे आदेश
वडगाव मावळ : इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त मावळ तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आदेश तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिले आहेत.
संघटनेच्या मागणीला यश
आद्य क्रांतिवीर उमाजी राजे क्षत्रिय रामोशी संघटना, मावळ तालुका यांच्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले होते. रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी उमाजी राजेंची जयंती असून रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी सरकारी कार्यालयात उत्सव न साजरा होण्याची शक्यता होती. त्यामुळे नायब तहसीलदार गणेश तळेकर आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती मावळ यांना निवेदन देऊन विशेष आदेश काढण्याची मागणी संघटनेने केली होती.
तहसीलदारांचा आदेश
या निवेदनाची दखल घेत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तातडीने आदेश काढत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, प्रमुख आस्थापना यांना जयंती साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व सरकारी कार्यालयांत उमाजी राजेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
ऐतिहासिक महत्त्व
राजे उमाजी नाईक हे इंग्रजांविरोधातील सशस्त्र लढ्याचे आद्य क्रांतिवीर मानले जातात. त्यांनी १८२६ मध्ये इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलून स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली. त्यांच्या बलिदानामुळे पुढे स्वातंत्र्य संग्रामाची पायाभरणी झाली. त्यामुळे त्यांची जयंती सरकारी स्तरावर साजरी करणे हा राष्ट्रीय स्वाभिमान आणि ऐतिहासिक स्मरणाचा भाग असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
आनंदाचा प्रतिसाद
तहसीलदारांच्या आदेशामुळे मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, स्वातंत्र्यसैनिकांचे वारस, स्थानिक नागरिक यांच्यात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. “सरकारी स्तरावर उमाजी राजेंच्या जयंतीचे औचित्य राखले जाणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे)९९२१८०७०११




















