लोणावळा शहर कचरा व्यवस्थापनासाठी बायो-CNG प्रकल्पास हिरवा कंदील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार
पुणे : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या लोणावळा-खंडाळा शहरातील वाढत्या कचरा व्यवस्थापन समस्येवर तोडगा काढण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील VVIP गेस्ट हाऊस येथे आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने बायो-CNG प्रकल्पास हिरवा कंदील मिळाला.
दररोज ७० मेट्रिक टन कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन
लोणावळा शहरात सध्या दररोज सुमारे ७० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण करून (ओला, सुका, प्लास्टिक, ई-कचरा) त्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायो-CNG आधारित आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. यामुळे दैनंदिन कचऱ्याचे १०० टक्के व्यवस्थापन होईल, तसेच पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीला चालना मिळेल.
जुन्या डंपिंग यार्डमधील १ लाख टन कचऱ्याचा प्रश्न निकाली
लोणावळ्यातील जुन्या डंपिंग यार्डमध्ये साचलेला जवळपास १ लाख मेट्रिक टन कचरा हा शहरासमोरील मोठा डोकेदुखीचा विषय होता. या कचऱ्याचे उच्चाटन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून, त्यामुळे शहराच्या स्वच्छतेला नवीन दिशा मिळणार आहे.
बैठकीत खालील मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली :
लोणावळा-खंडाळा स्वच्छ पर्यटन शहर म्हणून विकसित करणे
बायो-CNG आधारित आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारणे
जुन्या डंपिंग यार्डचे उच्चाटन करणे
दैनंदिन कचऱ्याचे शंभर टक्के वैज्ञानिक व्यवस्थापन करणे
महाराष्ट्रासाठी आदर्श हिल-टाउन मॉडेल विकसित करणे
या प्रकल्पासाठी आवश्यक निधी राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
बैठकीनंतर आमदार सुनील शेळके म्हणाले,
“लोणावळा-खंडाळा हे पर्यटन केंद्र म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध आहे. स्वच्छता, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि बायो-CNG प्रकल्पाद्वारे या शहराची प्रतिमा अधिक उंचावणार आहे. स्थानिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळणार असून, हे पाऊल महाराष्ट्रासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल.”
या निर्णयामुळे लोणावळा-खंडाळा परिसरात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत ऊर्जानिर्मितीचा नवा अध्याय सुरू होणार आहे.



















