
लोणावळ्यात लायन्स पॉईंटजवळ कार-टेम्पो भीषण धडक; गोव्याच्या दोन तरुणांचा मृत्यू, चालक जखमी
लोणावळा :लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ लायन्स पॉईंट येथे शनिवार ६ डिसेंबरच्या सकाळी झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. सकाळच्या सुमारास पर्यटन वाहतूक सुरू असताना हा मोठा अपघात घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.


मृत झालेल्या तरुणांची नावे दर्शन शंकर सुतार आणि मयुर वेंगुर्लेकर अशी असून दोघेही म्हापसा (गोवा) येथील रहिवाशी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हे दोघे कारने लोणावळ्याच्या दिशेने येत होते. दुसरीकडे, समोरून सहाराच्या दिशेने जाणारा टेम्पो नियमित मार्गावर होता. गर्दी नसल्याने रस्त्यावर वाहने वेगाने धावत होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग अत्यंत जास्त होता. उतारावर वेग नियंत्रित न राहिल्याने कार थेट टेम्पोवर जाऊन आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चेंदामेंदा झाला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता पाहता स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी तातडीने पोलिसांना व रुग्णवाहिकेला खबर दिली. पोलीस व बचाव पथके घटनास्थळी दाखल होईपर्यंत दोघांचे प्राण गेले होते.


टेम्पो चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. दरम्यान, अपघातस्थळाचा पंचनामा करण्यात आला असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
या घटनेबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण, कारचा वेग, तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येत आहे.


परिसरात मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ असताना असा अपघात घडल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























