
वाकसाईत लोखंडी सळईंच्या काळाबाजाराचा पर्दाफाश लोणावळा ग्रामीण पोलिंसाची धडक कारवाई १३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त ६आरोपी ताब्यात
लोणावळा : मावळ तालुक्यातील मौजे वाकसाई परिसरात सुरू असलेल्या लोखंडी सळईंच्या बेकायदेशीर साठवणूक व काळाबाजाराचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शितल ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत संशयास्पदरीत्या चाललेली मालाची चढउतार कारवाईत उघडकीस आली असून, या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सुमारे १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा लोखंडी सळईंचा साठा व वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली होती. वाकसाई गावाच्या हद्दीत शितल ढाब्याच्या मागील मोकळ्या जागेत कंटेनरमधून लोखंडी सळई उतरवून त्या दुसऱ्या वाहनात भरल्या जात असल्याची तसेच हा माल चोरीचा अथवा बेकायदेशीररीत्या मिळवलेला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी पंचांसह तातडीने छापा टाकला.


छाप्यादरम्यान घटनास्थळी आयसर कंपनीचा टेम्पो (एमएच १६ सीडी ५१९८) उभा असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोखंडी सळई आढळून आल्या. वाहनाजवळ सहा इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. पोलिसांनी सर्वांना घटनास्थळीच ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुसय्यद मोहम्मद इस्माईल शेख (२९), सनीदेओल रामअवतार राजभर (३२), हाकीनुर अब्दुल गणी सा (३८), अकलेश कुमार रामानंद राजभर (२८), सनीराज उर्फ रविंद्र रामतोल राजभर (१९) आणि पवन उर्फ अजयकुमार सोमई राजभर (१९) यांचा समावेश आहे.


पोलिसांनी आरोपींकडे सळईंबाबत चौकशी केली असता त्यांनी मालकी हक्क, खरेदी-विक्रीची बिले किंवा वाहतुकीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदर लोखंडी सळई चोरीच्या अथवा काळाबाजारातून आणलेल्या असल्याचा ठोस संशय पोलिसांना आला आहे. प्राथमिक तपासात आरोपी यापूर्वीही अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांत गुंतले असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईत सुमारे सहा टन वजनाच्या लोखंडी सळईंसह आयसर टेम्पो असा एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे करत आहेत.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















