
शतकपूर्तीचा सुवर्णक्षण : रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडेचा मानाच्या सत्काराने गौरव
तळेगाव दाभाडे : समाजसेवेची निस्वार्थ परंपरा आणि निरंतर जनकल्याणाची निष्ठा जपणाऱ्या रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडेचा शताब्दी महोत्सवी मानाचा सत्कार तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आला. हॉस्पिटलच्या मानवसेवेच्या अविरत प्रवासाचे हे सुवर्णक्षण ठरले असून, रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीची उज्ज्वल छटा या मंचावर प्रखरतेने झळकली.

समारंभात क्लबचे ट्रेनर रो. दीपक फल्ले, अध्यक्ष रो. संतोष परदेशी, सेक्रेटरी रो. प्रदीप टेकवडे आणि मेडिकल डायरेक्टर रो. सौरभ मेहता यांनी उपस्थित राहून मानाचा सत्कार स्विकारला. आरोग्य जनजागृती, सामाजिक उन्नती, विविध रुग्णसेवा प्रकल्प आणि समाजातील वंचित घटकांना भक्कम आधार देणाऱ्या उपक्रमांमुळे क्लबने वर्षानुवर्षे लोकविश्वासाचा स्तंभ भक्कम केला आहे. या परंपरेची दखल घेत मिळालेला गौरव सदस्यांसाठी प्रेरणादायी क्षण ठरला.


कार्यक्रमात समाजकार्यात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे रो. प्रदीप मुंगसे आणि रो. राकेश गरुड यांना “विशेष सत्कार” प्रदान करण्यात आला. सभागृहात उसळलेल्या टाळ्यांच्या गजराने आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने त्यांच्या सेवाभावी कार्याची जनमानसातली दखल स्पष्टपणे जाणवली.


रोटरी क्लबचे उपाध्यक्ष रो. प्रशांत ताये यांची उपस्थितीही कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली. रोटरीच्या ऐक्यभावनेची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव त्यांच्या सहभागातून अधोरेखित झाली.


हा मानाचा सन्मान मावळचे आमदार आदरणीय सुनील ‘आण्णा’ शेळके, रुबी हॉलचे प्रमुख पुरवेश ग्रँड तसेच तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या संचालक मंडळाच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परिसरातील डॉक्टर्स, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शतकपूर्तीचा हा ऐतिहासिक सोहळा रोटरी क्लबच्या निःस्वार्थ सेवेला दिलेला सर्वोच्च सन्मान ठरला—मानवी मूल्यांची आणि सेवा परंपरेची उजळण करणारा क्षण ठरल्याची भावना उपस्थितानी व्यक्त केली.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























