
स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी अनिल कोद्रे; १४ एप्रिल २०२६ रोजी सामुदायिक विवाह सोहळा
वडगाव मावळ : स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळा समितीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी अनिल कोद्रे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपत अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांत सक्रिय असलेल्या कोद्रे यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा अधिक व्यापक स्वरूपात आयोजित केला जाणार आहे.


समितीच्या कार्याध्यक्षपदी खंडूजी काकडे, कार्यक्रम प्रमुखपदी संभाजी येळवंडे, खजिनदारपदी अक्षय बेल्हेकर, सहखजिनदारपदी गणेश झरेकर, तर उपाध्यक्षपदी सुधीर ढोरे व कार्तिक यादव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रसिद्धीप्रमुखपदी केदार बवरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी संचालक विलास दंडेल, गणेश विनोदे, अरुण वाघमारे, राजेंद्र वहीले, सुनील शिंदे, अर्जुन ढोरे, विवेक गुरव, सदाशिव गाडे, अजय धडवले, रोहीदास गराडे, शंकर ढोरे, बाळासाहेब तूमकर, संजय दंडेल, सतीश गाडे, विकास लालगुडे, सुहास विनोदे, अनिकेत भगत आदी मान्यवर उपस्थित होते.


यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना दिलासा देत समाजातील ऐक्य, समता व सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.


नूतन पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, विवाह सोहळ्याचे आयोजन सुयोग्य नियोजन, पारदर्शकता व सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून करण्यात येईल.

सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले असून, आगामी विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.




















