शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या तत्परतेमुळे वाचला १३ फूट लांबीच्या अजगराचा जीव
कल्हाट (ता. मावळ): कल्हाट मावळ परिसरातील शेतकरी आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या टीमच्या संयुक्त प्रयत्नामुळे तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराचा जीव वाचवण्यात आला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये सर्पसंवर्धन आणि वन्यजीवांविषयी जागरूकतेचा संदेश पोहोचला आहे.

कल्हाट येथील शेतकरी बंडू पवार यांच्या शेतात हा भला मोठा साप दिसून आला. साप एकाच जागी थांबून राहिल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी आणि विकी दौंडकर यांच्याशी संपर्क साधला.

सदस्यांनी त्वरित वनविभागाला कळवून घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गावकऱ्यांनी तब्बल दोन तास त्या अजगरावर पाळत ठेवत परिसर सुरक्षित ठेवला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी, आकाश ओव्हाळ, विकी दौंडकर, साहिल लांडगे आणि केतीका कासेटवार यांनी शिताफीने आणि कौशल्याने अजगराला सुरक्षितपणे पकडले. गावकऱ्यांच्या संयमाबद्दल व मदतीबद्दल टीमने आभार मानले आणि सापांविषयी जनजागृती केली.

वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजगराची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर वनरक्षक काळूराम कडू यांच्या उपस्थितीत त्या अजगराला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
भारतीय अजगर हा बिनविषारी साप असून तो अत्यंत संथ असतो. माणसाला चावण्याची शक्यता फारच कमी असते. तो आपल्या शिकाराला विष न वापरता, घट्ट वेढून घुसमटवून मारतो. त्याच्या शरीराचा रंग पांढरट-तपकिरी असून त्यावर गडद तपकिरी ठिपके असतात. त्याची लांबी साधारणपणे १० ते १५ फूटांपर्यंत वाढू शकते.
सर्पदंश झाल्यास काय करावे
घाबरू नये आणि रुग्णाला शक्यतो शांत ठेवावे. चावलेली जागा कापू नये, घट्ट बांधू नये किंवा शोषण्याचा प्रयत्न करू नये.

रुग्णाला तत्काळ जवळच्या सुसज्ज रुग्णालयात घेऊन जावे, जिथे ASV (Anti-Snake Venom) उपलब्ध असतो. शक्य असल्यास सापाची ओळख सांगावी, परंतु त्यासाठी वेळ वाया घालवू नये. सर्पदंशाच्या घटनेत त्वरित सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवावे.
वन्यजीव अभ्यासक जिगर सोलंकी आणि विकी दौंडकर यांनी या प्रसंगी गावकऱ्यांना सापांविषयी माहिती देत “साप मारू नका, त्यांचेही पर्यावरणात महत्त्वाचे स्थान आहे” असा संदेश दिला.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















