
अखंड हनुमान मूर्तीचा शोध नवलाख उंब्रेच्या पुरातन वारशाला नवा उजाळा
नवलाख उंब्रे:मावळ तालुक्यातील नवलाखउंब्रे परिसराचा समृद्ध ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा उजेडात आला आहे. बधलवाडी येथील हनुमान मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी सुरू असलेल्या पाया खोदकामादरम्यान सुमारे 7 ते 8 फूट खोलीवर चपेटदान मुद्रेतील प्राचीन हनुमान मूर्ती सापडल्याने गावात तसेच इतिहासप्रेमींत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


स्थानिक नागरिक रवी कडलक, सोपान दहातोंडे आणि सचिन रौधळ यांनी ही माहिती इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांना कळवली. त्यानंतर मूर्तीचा सखोल अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे ही मूर्ती किमान शंभर वर्षांहून अधिक काळ जमिनीत गाडलेली असूनही कुठेही तुटलेली किंवा खंडित नाही. अखंड काळ्या शिळेत कोरलेली, सुबक आणि देखणी अशी ही अडीच फूट उंच मूर्ती अत्यंत आकर्षक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.
मूर्तीवरील अलंकारिक तपशीलही लक्षवेधी आहेत. हातातील कडे, बाजूबंद, मानेला कंठा, पायातील तोडे तसेच कमरेला सोवळ्यासदृश वस्त्र अत्यंत स्पष्टपणे दिसते. मूर्तीच्या पायाखाली कोरलेली पनवती ही शक्ती व विजयाचे प्रतीक मानली जाते. यामुळे हनुमंताचे अद्वितीय शौर्य दर्शविणारे हे शिल्प अधिक प्रभावी ठरते.


डॉ. बोराडे यांच्या अभ्यासानुसार, मूर्तीचा कालखंड अंदाजे 1850 च्या सुमारासचा असून ती 175 ते 200 वर्षे जुनी असावी. शिवकालीन परंपरेतील रचना, मध्ययुगीन शिल्पशैलीशी जुळणारी वैशिष्ट्ये आणि मूर्तिशास्त्रीय बारकावे यामुळे या मूर्तीचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.


नवलाखउंब्रे हे स्वतःच एक पुरातन वारशाचे जतनस्थान मानले जाते. शिवकालीन बाजारपेठेचे हे केंद्र आजही अनेक ऐतिहासिक वास्तूंनी नटलेले आहे—भैरवनाथ मंदिर, नगारखाना, आंग्लकालीन राम मंदिर, तळे, बारवा, पायऱ्यांच्या विहिरी, खापरी नळ व्यवस्था, समाधी, दीपमाळा आणि जुन्या बाजारपेठेचे अवशेष आजही या भूमीचा वैभव सांगत उभे आहेत. 1760–61 च्या शिलालेखात पापळ पाटील घराण्याचा उल्लेख मिळतो, तर पेशवाई काळात राम मंदिराला दिलेल्या इनामाची नोंदही उपलब्ध आहे.

या शोधाच्या पार्श्वभूमीवर, नवलाखउंब्रे परिसरातील कुटुंबांकडे मोडी लिपीतील दस्तऐवज आणि जुनी ऐतिहासिक कागदपत्रे असण्याची शक्यता इतिहास संशोधकांनी व्यक्त केली आहे. “ही कागदपत्रे संशोधनासाठी उपलब्ध करून देता आली, तर या भागाचा इतिहास अधिक व्यापक आणि शास्त्रीय पद्धतीने उजेडात आणता येईल,” असे आवाहन डॉ. बोराडे यांनी केले आहे.
नवलाख उंब्रेच्या मातीतील हा अद्भुत शोध केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा म्हणूनही अमूल्य ठरत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















