
अफवांना थारा नको, जागरूकतेची गरज; वनविभागाचे आवाहन
मावळ : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मावळ तालुक्यात निसर्गसंपन्न परिसरामुळे वन्यजीवांचा वावर असणे स्वाभाविक आहे. मात्र, अलीकडच्या काळात बिबट्या दिसल्याच्या अफवा आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित संदेशांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मावळात मानव–वन्यजीव संघर्षाबाबत गैरसमज दूर करून वैज्ञानिक माहिती व जनजागृतीवर भर देण्याची गरज असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


वनविभागाच्या अभ्यासानुसार अनेक वेळा रानमांजर, तरस किंवा उदमांजर यांसारख्या प्राण्यांची चुकीची ओळख बिबट्या म्हणून केली जाते. माहितीच्या अभावामुळे आणि जुन्या किंवा इतर भागातील व्हिडिओ मावळातील असल्याचे सांगून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम शेतीकामे, दैनंदिन ये-जा तसेच मुलांच्या शाळेवर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


ही परिस्थिती लक्षात घेऊन वनविभाग वडगाव मावळ आणि ‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्था संयुक्तपणे जनजागृतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. गावोगावी प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात येत असून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वन्यजीवांच्या हालचालींचे शास्त्रीय निरीक्षण केले जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल म. हिरेमठ, वनरक्षक एस. के. मोरे, पी. कासोले, यो. कोकाटे, मंगल दाते, वनसेवक किसन गावडे तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, तुषार सातकर, जिगर सोलंकी, विकी दौंडकर, प्रमोद ओव्हाळ आदी नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.


या मोहिमेत ‘काय करावे आणि काय करू नये’ यावर विशेष भर देण्यात येत आहे. रात्री एकटे बाहेर जाणे टाळणे, हातात बॅटरी व काठी ठेवणे, शेतात जाताना आवाज होईल याची काळजी घेणे, संशयास्पद प्राणी दिसल्यास त्याचा पाठलाग न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधणे, अशा साध्या पण उपयुक्त उपायांची माहिती देण्यात येत आहे.
नवलाख उंबरे परिसर डोंगराळ व जंगलव्याप्त असून त्यालगत औद्योगिक, शेती व वसाहती क्षेत्र असल्याने मानव–वन्यजीव संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवणे, परिसर प्रकाशमय ठेवणे व स्वच्छता राखणे, असे प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राखीव वनहद्दी लगत बेकायदेशीर उत्खनन, सुरुंग किंवा आग लावण्याच्या घटना आढळल्यास भारतीय वन अधिनियम १९७२ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वनविभागाने दिला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, योग्य माहिती आणि सामूहिक जबाबदारीतूनच मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळता येईल, असे मत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी व्यक्त केले.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















