देहुगाव – देहूरोड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी : माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
देहुगाव : देहुगाव-देहूरोड हा प्रमुख वर्दळीचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दुरावस्थेत आहे. झेंडे मळा, हगवणे मळा, काळोखे मळा तसेच देहूरोड डीडीपासून देहुगावपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांसमोर ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या रस्त्यावरून रोज हजारो दुचाकी व चारचाकी वाहने धावतात. मात्र मोठे खड्डे आणि चिखल यामुळे वाहनचालकांचा तोल जात आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी आपली भाजीपाला व पिके बाजारात नेण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात, मात्र खड्ड्यांतून जाणे म्हणजे त्यांच्यासाठी अक्षरशः ‘तारेवरची कसरत’ ठरत आहे.
देहू हे संत तुकाराम महाराजांच्या कार्याशी संबंधित आस्थेचे ठिकाण असल्याने येथे राज्यभरातून भाविक येत असतात. परंतु रस्त्यांची दुरावस्था पाहून भाविकांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिक अनेकदा या समस्येबाबत आवाज उठवत असले तरी तोडगा निघालेला नाही.
या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी थेट जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. देहुगाव-देहूरोड रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. निवेदन स्वीकृत करताना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून दुरुस्तीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी माजी राज्यमंत्री भेगडे यांच्यासोबत देहुगाव-देहूरोड परिसरातील स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी आता अधिकृतरीत्या प्रशासनापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)




















