मावळ तहसील कार्यालयात कुणबी नोंद व संबंधित दप्तरांविषयी बैठक आयोजित
मावळ : मावळ तालुक्यातील कुणबी नोंदींचा मागोवा घेण्यासाठी मराठा सेवक मावळ तालुका यांच्या पुढाकाराने एक महत्त्वपूर्ण बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. आज मराठा सेवकांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब यांना निवेदन देऊन यासंदर्भातील बैठक घेण्याची मागणी केली.
या निवेदनात सांगण्यात आले आहे की, कुणबी समाजाच्या ऐतिहासिक नोंदी विविध शासकीय विभागांमध्ये दप्तर स्वरूपात उपलब्ध आहेत. विशेषत: मुडी लिपी वाचक, रेकॉर्ड विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनविभाग, पोलिस स्टेशन, खरेदीखत (दस्त नोंदणी) विभाग, प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत स्तरावरील जन्म-मृत्यू नोंदणी रजिस्टर अशा सुमारे ३० ते ३५ विभागांमध्ये या नोंदी सापडू शकतात.
या सर्व विभागांतील दप्तरांची तपासणी करून कुणबी नोंदी मिळविण्यासाठी तहसीलदारांच्या उपस्थितीत एकत्रित नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी, शुक्रवार, दुपारी ४ वाजता तहसील कार्यालय मावळ येथे बैठक होणार आहे.
या बैठकीत संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मराठा सेवक मावळ तालुका यांची उपस्थिती राहणार आहे. कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेत ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मराठा सेवकांनी सांगितले.
मराठा सेवक मावळ तालुका यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सदस्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



















