
मावळमधील सांगवडे–जांबे पूल धोक्यात; अवजड वाहतुकीस तातडीची बंदी घालण्याची ग्रामस्थांची मागणी
मावळ : मावळ तालुक्यातील सांगवडे–जांबे मार्गावरील महत्त्वाचा पूल सध्या अत्यंत कमकुवत अवस्थेत असल्याने भीषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातत्याने सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुलाच्या संरचनेला तडे गेले असून, ग्रामस्थांनी या पुलावरून अवजड वाहतूक तातडीने बंद करण्याची जोरदार मागणी केली आहे.


सांगवडे, जांबे, व परिसरातील गावांना जोडणारा हा पूल दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र अलीकडे या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर डंपर, ट्रक, रेडीमिक्स काँक्रीटची वाहने तसेच बांधकाम साहित्य वाहून नेणारी अवजड वाहने सुरू असल्याने पुलाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. स्लॅब उखडणे तसेच लोखंडी सळ्या उघड्या पडणे असे धोकादायक प्रकार दिसून येत आहेत.


विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात ही परिस्थिती अधिक गंभीर असते एखादा मोठा अपघात घडल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अनेक वेळा याबाबत स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.


संबंधित विभागाने पुलाची तातडीने पाहणी करून त्याची मजबुती तपासावी, आवश्यक असल्यास दुरुस्ती किंवा नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी केली आहे.

पुलाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















