इंद्रायणी नदीत आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला : वन्यजीव रक्षक संस्था व ग्रामस्थांचा धाडसी बचाव
कामशेत : मावळ तालुक्यातील कामशेत रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) रात्री इंद्रायणी नदीत एका वयस्कर इसमाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतली. मात्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व कामशेत ग्रामस्थांच्या तत्परतेने आणि धाडसी बचावकार्यातून त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात आला. ही घटना रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत रेल्वे स्टेशन परिसरातून मदतीसाठी आरडाओरड ऐकू आल्याने पोलिस पाटील जाधव यांनी त्वरित घटनास्थळाकडे धाव घेतली. आवाज नदीच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी नदीकाठी पाहणी केली असता, एक इसम पाण्यात बुचकळ्या खात असल्याचे आढळले. तात्काळ कामशेत पोलिस चौकीला माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. दोरखंड व लाईफ जॅकेटच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. शुभम आंद्रे, सचिन शेडगे व किशोर लष्करी या स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली आणि बुचकळ्या खात असलेल्या इसमाला बाहेर काढले.
वाचवलेल्या व्यक्तीने आपले नाव काशिनाथ भीमा मेरगळे (वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे, मूळ रा. विजापूर जिल्हा, सध्या रा. चाकण) असे सांगितले. परिस्थितीला वैतागून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी कबूल केले. सुदैवाने ग्रामस्थ व वन्यजीव रक्षकांच्या धाडसामुळे त्यांचा जीव वाचला.
या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलिस करीत आहेत. या बचाव मोहिमेत स्थानिक पोलिस पाटील जाधव यांच्यासह वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, सचिन शेडगे, किशोर लष्करी यांनी थेट सहभाग घेतला.
या कार्यवाहीचे परिसरात व सोशल मीडियावर कौतुक होत असून, संकटग्रस्त व्यक्तीला वाचवून मानवतेचे खरे उदाहरण दाखविल्याबद्दल वन्यजीव रक्षक मावळ संस्था व कामशेत ग्रामस्थांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे.
(प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे)९९२१८०७०११



















