मावळात ‘नशे’वर पोलिसांचा प्रहार! दोन ठिकाणी धडक कारवाई. गांजा विक्रेते जाळ्यात
मावळ : मावळ तालुक्यात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अखेर कंबर कसली आहे. शनिवारी (दि.६) पोलिसांनी दिवसभरात दोन ठिकाणी धडाकेबाज छापे टाकत गांजा विकणाऱ्या दोघांना गजाआड केले. या कारवाईमुळे नशेच्या धंद्यात रममाण झालेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


पहिल्या कारवाईत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी नवलाख उंब्रे, बधलवाडी परिसरात जाऊन ७८ वर्षीय धर्माजी सोपान बधाले यांच्यावर कारवाई केली. वृद्धापकाळ आणि अवैध धंदा—या विचित्र जोडगोळीमुळेच पोलिस अधिक सावध झाले. छाप्यात त्यांच्या ताब्यातून तब्बल २०० ग्रॅम गांजा मिळाला. किंमत साधारण १० हजार रुपये. एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून बीएनएसएस ३५(३) नोटीस बजावण्यात आली असून एमआयडीसी पोलीस पुढील तपासात गुंतले आहेत.


दुसऱ्या धाडीमध्ये देहुरोड पोलिसांनी बंगळूर–हायवेवरील चर्चसमोरील बस स्टॉप परिसरात संशयित हालचाली करणाऱ्या अनील जगन्नाथ बोरसे (वय ४९, रा. आंबेडकरनगर) याला जेरबंद केले. तपासात त्याच्या पिशवीत ११९ ग्रॅम गांजा आढळून आला. किंमत १,५५० रुपये. त्याच्यावर एनडीपीएस अॅक्टचे संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.


मावळात नशेचे जाळे पसरू नये म्हणून पोलिसांनी पुढील दिवसांतही अशीच धडक मोहीम सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे. युवकांचे भविष्य नशेत बुडू नये म्हणून नशे मुळे युवक गुन्हेगारीकडे वळू नयेत याकरिता पोलिसांचे प्रयत्न जास्त जोमाने सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















