
गोल्डन रोटरीचा उपक्रम यशस्वी : कर्करोग तपासणीत 124 महिलांचा सहभाग
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, टी.जी.एच. ऑनको-लाईफ कॅन्सर सेंटर, आरसीसी आणि आशा सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत स्तन व गर्भाशयमुख कर्करोग तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमात तब्बल 124 महिलांची मोफत तपासणी करण्यात आली.


शिबिरात थर्मल तपासणी, स्तन कर्करोग तपासणी तसेच पॅप स्मिअर यांसारख्या अत्यावश्यक तपासण्या पूर्णपणे विनामूल्य करून देण्यात आल्या. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन दिपाली शिंदे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले.
डॉ. सौरभ मेहता यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. प्रोजेक्ट चेअरमन रो. डॉ. धनश्री काळे यांनी प्रास्ताविकातून या शिबिराचे उद्दिष्ट, महिलांच्या आरोग्याचे वाढते महत्त्व आणि नियमित तपासणीची गरज यावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे डॉ. ज्योती मेहता (Onco Life Hospital) आणि डॉ. चौधरी (PHC) यांनी महिलांच्या आरोग्याविषयी माहितीपूर्ण मार्गदर्शन करत कर्करोग तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.


क्लबचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी यांनी सामाजिक आरोग्यसेवेसाठी रोटरी क्लबची सततची बांधिलकी व्यक्त केली. कार्यक्रमाध्यक्ष डॉ. सुमेधा भोसले (District Medical Director) यांनी प्रेरणादायी शब्दांत शिबिराची अधिकृत घोषणा केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपाध्यक्ष रो. प्रशांत ताये यांनी डॉक्टर, आरोग्यसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरसीसी, आशा सेविका, सर्व रोटरी सदस्य आणि नागरिकांचे मनापासून आभार मानले. उपस्थितांनी महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकतेसाठी गोल्डन रोटरी क्लबने उचललेले हे पाऊल अत्यंत उपयुक्त ठरल्याचे समाधान व्यक्त केले.


आयोजनात सक्रिय सहकार्य :
दिपक फल्ले, प्रदीप टेकवडे, बसाप्पा भंडारी, प्रदीप मुंगसे, निखिल महापात्रा, दिनेश चिखले, राकेश गरुड, दिक्षा वाईकर, सुजाता देव, चेतन पटावा, विजय गोपाळे, कविता खोल्लम आणि सुरेश बावबंदे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















