मुकाई मित्र मंडळ आणि प्रशांत दादा भागवत यांचा पुढाकार
“इंद्रायणी माईच्या सेवेत – पर्यावरणप्रेमींची अनोखी सामाजिक धुरा”
इंदोरी (प्रतिनिधी): गणपती उत्सव हा आनंद, श्रद्धा आणि भक्तीचा सोहळा. मात्र, विसर्जनानंतर नदीघाटांवर दिसणारे चित्र मात्र वेदनादायी असे. निर्माल्याचे ढीग, नदीकाठी पडून राहिलेल्या मूर्ती, पसरलेली दुर्गंधी – हे पाहून प्रत्येक भाविकाच्या मनाला चटका लागे. श्रद्धेने पूजलेल्या बाप्पाच्या मूर्तींची दुर्दशा होताना पाहणे भाविकांना सहन होत नव्हते.
ही वेदना मनाला भिडली ती इंदोरी येथील प्रशांत दादा भागवत यांना आणि मुकाई मित्र मंडळातील कार्यकर्त्यांना. आणि याच वेदनेतून उदयास आला एक अद्वितीय सामाजिक उपक्रम. आजपासून तब्बल १५ वर्षांपूर्वी या मंडळाने इंद्रायणी माईच्या रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
समाजहिताची धुरा – १५ वर्षांचा प्रवास
प्रशांत दादा भागवत हे गेल्या पंधरा वर्षांपासून मुकाई मित्र मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी केवळ धार्मिक कार्यक्रमांमध्येच नव्हे तर सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यातही अग्रेसर भूमिका बजावली आहे.
दरवर्षी गणेश विसर्जन काळात विशेष पथके घाटांवर तैनात केली जातात. भाविकांना विसर्जनापूर्वी निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करण्याचे आवाहन केले जाते. जमा झालेले निर्माल्य पुढे सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करून शेतीसाठी वापरले जाते.
तसेच, विसर्जनानंतर घाटावर अथवा नदीकिनारी एकही मूर्ती टाकून न ठेवता नीट व्यवस्थापन केले जाते. यामुळे घाट परिसर स्वच्छ राहतो, दुर्गंधी पसरत नाही, रोगराई आळवली जाते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भक्तीभावाने केलेल्या पूजेला गालबोट लागत नाही.
इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठाम भूमिका
या उपक्रमामुळे आज इंद्रायणी नदी प्रदूषणापासून वाचली आहे. स्वच्छ घाट, स्वच्छ नदी आणि शिस्तबद्ध वातावरण यामुळे विसर्जन उत्सवाचा सांस्कृतिक व धार्मिक पवित्रपणा जपला जातो.
प्रशांत दादा भागवत यांचे मनोगत
या कार्याबाबत बोलताना प्रशांत दादा भागवत म्हणाले “बाप्पाची पूजा करून त्याच मूर्तीची दुर्दशा होताना आम्हाला कधीच पाहवत नव्हती. म्हणूनच गेली पंधरा वर्ष आम्ही हे समाजकार्य करत आहोत. ही इंद्रायणी आमची माई आहे, तिची सेवा ही आमची जबाबदारी आहे.”
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुकाई मित्र मंडळाच्या या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेकजण स्वतःहून निर्माल्य वेगळे करण्यास पुढाकार घेतात. अनेक सामाजिक संस्थांनीही या कार्यात सहकार्य करायला सुरुवात केली आहे.
एक अनोखी परंपरा
इंदोरी गावात गेली १५ वर्षे रुजलेली ही परंपरा आता पर्यावरण पूरक उत्सवाचे उत्तम उदाहरण बनली आहे. समाजाच्या सहभागातून आणि पर्यावरणप्रेमातून जन्माला आलेला हा उपक्रम आज महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.



















