
वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : अंतिम मतदार याद्या जाहीर
वडगाव (ता. मावळ) – वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भातील तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार नगरपंचायतीच्या अंतिम मतदार यादीचे प्रकाशन करण्यात आले असल्याची माहिती वडगाव नगरपंचायतीकडून देण्यात आली आहे.


नगरपंचायतीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत सूचनेनुसार, अंतिम मतदार याद्या आता वडगाव नगरपंचायत कार्यालयात तसेच npvadgaon.in आणि mahaulb.in या संकेतस्थळांवर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना या वेबसाइटवर जाऊन स्वतःचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासण्याची तसेच आवश्यक असल्यास मतदार यादी डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २ नोव्हेंबर २०२५ पासून संबंधित नगरपंचायत कार्यालयात मतदार यादीची छापील प्रती उपलब्ध राहणार असून नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.


मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “वडगाव शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या नावाची नोंद अंतिम मतदार यादीत तपासावी. ही यादीच पुढील निवडणुकीदरम्यान मतदानासाठी वापरली जाणार असल्यामुळे नागरिकांनी वेळेत पडताळणी करावी.”


राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला आता वेग येणार आहे. नागरिकांमध्ये आगामी निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून स्थानिक राजकीय घडामोडींनाही यामुळे वेग आला आहे.



















