
वर्गातूनच स्वच्छतेचा मंत्र’ : तळेगाव दाभाडेतील शाळांमधे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचा आदर्श उपक्रम
तळेगाव दाभाडे : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत तळेगाव दाभाडे शहरातील विविध शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापनावर आधारित जनजागृती कार्यशाळांचे प्रभावी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करून पर्यावरणपूरक जीवनशैलीची सवय लावणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. वर्गखोल्यांतूनच स्वच्छतेचे धडे दिले जात असल्याने हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला.


या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना कचऱ्याचे प्रकार, ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याचे महत्त्व, स्वच्छतेच्या दैनंदिन सवयी, प्लास्टिक बंदीची गरज तसेच कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रण याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मार्गदर्शक राम साठे सर यांनी ५ आर संकल्पना — Refuse, Reduce, Reuse, Recycle आणि Recover — सोप्या भाषेत व प्रभावी उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितली. घर, शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्यात विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे प्रात्यक्षिकातून स्पष्ट करण्यात आले.


कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रश्नोत्तरे केली. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या (पॉकेट) व पेन देऊन प्रोत्साहन देण्यात आले. घरातूनच कचऱ्याचे विलगीकरण करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि स्वच्छतेचा संदेश कुटुंब व समाजापर्यंत पोहोचवणे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कचरा मुक्त व स्वच्छ शहरे घडविण्यासाठी विद्यार्थी, शाळा व नागरिक यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. लहानपणापासून स्वच्छतेचे संस्कार रुजल्यास स्वच्छ, सुंदर व निरोगी समाज निश्चितपणे घडू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हा उपक्रम तळेगाव दाभाडे नगरपरिषद व स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता अभिषेक शिंदे, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे तसेच शहर समन्वयक शुभम चौकटे यांनी प्रत्येक शाळेत जाऊन कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११
















