
तळेगावात ज्ञानाचा जागर श्री गणेश मोफत वाचनालयात दोन दिवसीय अॅड. दादासाहेब परांजपे व्याख्यानमाला
तळेगाव दाभाडे : ज्ञान, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगमातून समाजप्रबोधनाचा जागर करणारी अॅड. दादासाहेब परांजपे स्मृती व्याख्यानमाला येत्या शुक्रवार दि. २३ व शनिवार दि. २४ जानेवारी रोजी तळेगाव दाभाडे येथे संपन्न होत आहे. श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून कै. सौ. क्षमा अरविंद शहा सभागृहात दररोज सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.


आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ ही संकल्पना केवळ तंत्रज्ञांपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. शिक्षण, उद्योग, आरोग्य, बँकिंग, प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात एआयचे महत्त्व वाढत असताना सामान्य नागरिकांमध्ये या तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी नूतन नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध वक्त्या डॉ. सौ. प्रांजली देशपांडे ‘बुद्धीमतेचा संगणकीय प्रवास’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मानवी बुद्धिमत्तेपासून संगणकीय विचारप्रक्रियेपर्यंतचा प्रवास, कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास, तसेच तिचे फायदे व मर्यादा यावर त्या सविस्तर प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमास प्रा. डॉ. प्रमोद बोराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


पहिल्याच दिवशी नूतन नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असून कै. सुरेशभाई शहा वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाचा कार्यक्रम ज्ञानवर्धनासोबतच प्रेरणादायी ठरणार आहे.


शनिवार दि. २४ जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध लेखक, अभियंता व प्रभावी वक्ते अच्युत गोडबोले ‘एआयची जादू व उद्याचे जग’ या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. एआयमुळे बदलणारे शिक्षणाचे स्वरूप, रोजगाराच्या संधी, उद्योगविश्वातील क्रांती आणि भविष्यातील मानवी जीवन यावर गोडबोले आपल्या ओघवत्या शैलीत विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निखिल तांबे असतील, तर उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी ऋषी अरोरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय, ती आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकणार आहे आणि बदलत्या काळात आपण स्वतःला कसे सज्ज करावे, याबाबत मार्गदर्शन मिळविण्यासाठी नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणेश मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी, चिटणीस प्रितम भेगडे, ग्रंथपाल सौ. विनया अत्रे तसेच कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















