
धम्मभूमीवर साकारले बाबासाहेबांचे स्वप्न : श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक जाणीवेचा जागर
देहुरोड:भारतीय समाजाला समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देहूरोड येथे स्थापन केलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र मूर्तीच्या स्थापनेला ७१ वर्षे पूर्ण झाली. या वर्धापनदिनानिमित्त देहूरोडच्या धम्मभूमीवर गुरुवारी जे चित्र दिसले, ते केवळ धार्मिक कार्यक्रमाचे नव्हे, तर सामाजिक जाणीवेच्या जागराचे होते. पंचक्रोशीसह राज्याच्या विविध भागांतून हजारो अनुयायी, भीमबांधव आणि धम्मप्रेमी येथे एकवटले होते. हा जनसागर बाबासाहेबांच्या विचारांवरील अढळ विश्वासाचे दर्शन घडवणारा ठरला.


२५ डिसेंबर १९५४ रोजी बाबासाहेबांनी देहूरोड येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना केली. रंगून येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भेट स्वरूपात मिळालेली ही मूर्ती आजही सामाजिक परिवर्तनाची साक्ष देत उभी आहे. केवळ श्रद्धेचा विषय न राहता, ती विवेक, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेची प्रेरणा बनली आहे. या स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांनी या ऐतिहासिक वारशाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.


धम्मजागृती अभियान, बुद्धवंदना, पंचशील ध्वजारोहण, धम्मप्रवचन आणि धम्मदिशा कार्यक्रमांनी परिसरात वैचारिक वातावरण निर्माण केले. पुरस्कार वितरणातून समाजातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अस्थिस्तूपाच्या दर्शनासाठी भाविकांनी दाखवलेली शिस्त आणि शांतता. ही शिस्त बाबासाहेबांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी असल्याचेच दर्शन घडवते.


समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दिलेली मानवंदना ही केवळ औपचारिक नव्हती, तर सामाजिक अनुशासनाचे प्रतीक होती. परिसरात उभारलेली पुस्तके, बुद्धमूर्ती, वैचारिक साहित्याची दुकाने, तसेच अल्पोपहार केंद्रांमुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप आले. मात्र या उत्सवामागे असलेला संदेश मात्र गंभीर आणि परिवर्तनकारी होता.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा, राज्य राखीव दल, तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाने केलेली आरोग्य व आपत्कालीन सेवांची व्यवस्था कौतुकास्पद ठरली. सकाळी काढण्यात आलेली महाधम्म रॅली आणि रक्तदान शिबिरात ११० जणांनी केलेले रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे.

धर्माला केवळ कर्मकांडात अडकवू न देता, त्यातून सामाजिक परिवर्तनाचा मार्ग शोधणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा देहूरोड धम्मभूमीवर पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाला.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















