ओझर्डे येथे श्री काळभैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता उत्सवात भक्तिरसाचा उत्स्फूर्त आविष्कार
वडगाव मावळ (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ओझर्डे गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता यांच्या वार्षिक उत्सवाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मंगळवार (दि. ७ एप्रिल २०२६) रोजी हा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत सजलेली भव्य पालखी मिरवणूक आणि देवीचा दिमाखदार छबिना यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.
उत्सवाच्या निमित्ताने काल्याचे कीर्तनरूपात सेवा ह.भ.प. तुषार महाराज दळवी (मावळ भूषण) यांनी सादर केली. त्यांच्या ओजस्वी कीर्तनामुळे उपस्थित भाविकांना अध्यात्मिक उंचीचा अनुभव मिळाला.
याच पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती स्थापना सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सवही मोठ्या दिमाखात पार पडला. रविवार (दि. ५ एप्रिल) रोजी ह.भ.प. दत्तात्रय महाराज शिंदे (बऊर) यांचे प्रभावी प्रवचन झाले, तर सोमवार (दि. ६ एप्रिल) रोजी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज काजळे (चिखलसे) यांनी आपल्या ओजस्वी वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या मंगलप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची स्थापना करून धार्मिक परंपरेत एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला गेला.
गेल्या पन्नास वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार आणि कीर्तनकारांची मांदियाळी लाभली. रविवार (दि. ५ एप्रिल) रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन झाले, तर सोमवार (दि. ६ एप्रिल) रोजी ह.भ.प. माऊली महाराज कोतुळे (झी टॉकीज फेम) यांची रसाळ कीर्तन सेवा भाविकांना लाभली.
या सोहळ्यास नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे संस्थापक मृदुंग सम्राट नंदराज महाराज पाटील तौर आणि ह.भ.प. मधुकर महाराज गराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अन्नदाते श्री संजयजी शशिकर भोज (भोज डेव्हलपर्स) यांनीही उदारहस्ते योगदान दिले.
रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या नाट्यरूपी ‘गुरुदेव दत्त प्रसादिक भजनी भारुड’ या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. अक्षय साऊंड सर्विस, साई पुष्प फुल भंडार, साई दिगंबरा डीजे, के.पी. केटरर्स, पारखी वॉटर सप्लाय, श्रीराम ढोल पथक तसेच सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा उत्सव अविस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.























