किनारा – अनाथ वृद्धांची मुलगी प्रीती वैद्य
जीवनात प्रत्येकाला सुखदुःखाची दोरी घट्ट धरून चालावे लागते. कुणाच्या आयुष्यात संघर्ष कमी तर कुणाच्या जास्त, पण काही जण त्या संघर्षाला शरण न जाता त्याच्याच आधारावर समाजासाठी दीपस्तंभ बनतात. अशाच एका तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे – श्रीमती प्रीती वैद्य.
संगीत शिक्षिका म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास दु:खाच्या वादळाने हादरला. अवघ्या ३७ व्या वर्षी पतीला कर्करोग झाला आणि काही काळानंतर त्यांचे निधन झाले. एका क्षणात आयुष्याची सारी घडी विस्कटली. पती गमावला, नोकरी हातातून गेली, १२ वर्षांचा मुलगा जबाबदारीत उरला. कुणालाही या दु:खात कोसळणे स्वाभाविक होते; पण प्रीतीताईंच्या मनात दु:खापेक्षा समाजासाठी काहीतरी घडवण्याचा संकल्प उगम पावला.
एका वृद्धाश्रमात संगीत शिकवताना त्यांनी पाहिले –
“आपल्या मुलांना वाढवण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक श्वास देणारे आई-वडील, त्यांच्याच मुलांच्या हातून वृद्धाश्रमात सोडले जातात!”
हा विचार त्यांच्या हृदयाला पिंजऱ्यातील पक्ष्यासारखा अस्वस्थ करून गेला. त्या क्षणापासून त्यांनी ठरवले – “मी या वृद्धांची मुलगी बनेन!”
सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श डोळ्यांसमोर होता. सिंधुताईंनी जशी अनाथ मुलांना आईचे छत्र दिले, तशीच मी अनाथ वृद्धांची मुलगी होऊ शकते, हा निर्धार प्रीतीताईंनी केला. त्यांच्या आई-वडिलांनीही या विचाराला मनापासून पाठिंबा दिला. वडिलांनी स्वतःची नोकरी सोडून मुलीच्या कार्यात खांदा लावला. आईने आश्वस्त केले – “भूतकाळात न रमता, आज आणि उद्यासाठी जग. तेव्हाच मोठं घडवशील.”
आणि मग सुरू झाला ‘किनारा’चा प्रवास.
१० बाय १० च्या छोट्याशा खोल्यांतून, स्वतः स्वयंपाक, औषधोपचार, कपडे धुणे, डायपर बदलणे अशी सर्व कामे स्वतः करून सुरू झालेले हे कार्य हळूहळू विस्तारत गेले. २००९ मध्ये ‘किनारा वृद्धाश्रम’ अधिकृत नोंदणीकृत झाला. २०१२ मध्ये वायसीएम हॉस्पिटलमधून आलेल्या अनाथ वृद्धाच्या प्रवेशाने जणू या कार्याला खरी दिशा मिळाली. त्यानंतर पोलीस ठाणे, सरकारी रुग्णालये यांच्याशी संपर्क वाढवून असंख्य अनाथ वृद्धांना ‘किनाऱ्याचा आधार’ मिळू लागला.
आज ‘किनारा’ म्हणजे –
फुटपाथवर सोडले गेलेले, रुग्णालयांतून निराधार झालेले, मुलांकडून ताटातूट झालेले, अंथरुणाला खिळलेले, मतिमंद किंवा अपंग झालेले – अशा सत्तरहून अधिक वृद्धांचे कायमचे घर.
अनाथतेच्या अंधारात हरवलेल्या वृद्धांसाठी ‘किनारा’ हा केवळ आश्रम नाही, तर मायेचा, आधाराचा आणि सन्मानाचा प्रकाशस्तंभ आहे.
श्रीमती प्रीती वैद्य यांना मिळालेले अनेक पुरस्कार – ‘समाजभूषण’, ‘स्वानंदी भरारी’, ‘जिजाऊ पुरस्कार’, ‘अभया सन्मान’ – हे फक्त गौरवचिन्ह नाहीत, तर त्यांच्या सेवेला समाजाने वंदन केलेली अभिव्यक्ती आहे.
प्रीतीताईंचा प्रवास आपल्याला शिकवतो –
“संघर्ष हा जीवनाचा शेवट नसतो; उलट तोच समाजासाठी काहीतरी मोठं करण्याची सुरुवात असते.”
आज हजारो वृद्धांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू आहेत, कारण त्यांना किनाऱ्याचा स्पर्श लाभला आहे. आणि हा स्पर्श म्हणजेच प्रीती वैद्य या एका साध्या स्त्रीचे असामान्य योगदान!
(संजय दंडेल )




















