नायगावात गटार व्यवस्थेचा बोजवारा; फुटलेल्या चेंबरमुळे आरोग्यधोका वाढला
नायगाव (कामशेत, मावळ) : कान्हे-नायगाव ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव गावात गटार व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. गटार पाइपलाइनमधील चेंबर फुटलेल्या अवस्थेत असल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असून परिसरात अस्वच्छतेची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. मारुती मंदिर ते मुंबई-पुणे महामार्ग या दरम्यानचा पट्टा विशेषतः बाधित झाला असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत आहेत.
गेल्या काही दिवसांत गटार यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे स्पष्ट दिसत आहे. फुटलेल्या चेंबरमधून बाहेर पडणारे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहत आहे. परिणामी पादचारी व वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून सकाळ-सायंकाळच्या वेळेत या दुर्गंधीची तीव्रता अधिक जाणवत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
या अस्वच्छ परिस्थितीमुळे आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढली असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या परिस्थितीचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी नोंदवूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाकडून काही ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना केल्याचे दिसून येते; मात्र त्या अपुऱ्या ठरत असून समस्येचे मूळ स्वरूप कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी संपूर्ण गटार लाईनची दुरुस्ती करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते दशरथ शिंदे यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, नायगावची वार्षिक यात्रा गुरुवार, १९ मार्च रोजी होणार असून त्या निमित्ताने गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने सध्याची अस्वच्छता चिंतेची बाब ठरत आहे. यात्रेपूर्वीच गटार चेंबरची दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. फुटलेली गटार पाइपलाइन व चेंबर त्वरित दुरुस्त करणे, साचलेले सांडपाणी हटवून स्वच्छता मोहीम राबविणे, तसेच डास नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
नायगावातील ही समस्या केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेशी निगडित आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक ठरत आहे.
प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११























