शिवकालीन शौर्याचा साक्षीदार ओसाड! वीर नारोजी देशपांडे समाधीची दुरवस्था: प्रशासन झोपेत
वडगाव (मावळ) : स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर नारोजी बापुजी देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेली ऐतिहासिक समाधी आज दुर्लक्षामुळे ओसाड अवस्थेत पडली असून शिवकालीन वारशाकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याचे चित्र वडगाव येथे पाहायला मिळत आहे. वाढलेली झाडी, अस्वच्छ परिसर आणि मोडकळीस आलेली रचना यामुळे या ऐतिहासिक स्थळाची दुरवस्था झाली असून स्थानिक नागरिक व इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वडगावमधील हे ठिकाण पूर्वीपासून घुमटेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मात्र इतिहास संशोधनातून येथे स्वराज्याचे शूर सरदार नारोजी देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी समाधी उभारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या स्थळाला केवळ धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वही लाभले आहे. शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ठिकाणी राज्यभरातून इतिहास अभ्यासक, शिवभक्त तसेच गिर्यारोहक आवर्जून भेट देत असतात.
इतिहासातील उल्लेखानुसार, सूरत स्वारी करून परत येत असताना मुघल सैन्याने महाराजांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी लुटीची संपत्ती घोड्यांवर असल्याने थेट युद्ध करणे कठीण होते. परिस्थितीची जाणीव होताच महाराजांनी नारोजी देशपांडे यांना पुण्यातून दोन हजार सैन्यासह मुघलांना रोखण्याचे आदेश दिले. तळेगाव-वडगाव परिसरात तब्बल तीन दिवस प्रखर युद्ध पेटले. या लढाईत नारोजींनी शौर्याची पराकाष्ठा गाठत स्वराज्यासाठी वीरमरण पत्करले. राजगडावर पोहोचल्यानंतर ही दु:खद वार्ता समजताच महाराज स्वतः चार फेब्रुवारी १६६४ रोजी वडगाव येथे येऊन त्यांच्या स्मरणार्थ समाधी उभारल्याची माहिती इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी दिली.
या ऐतिहासिक स्थळाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे तसेच देशपांडे कुटुंबीयांनीही भेट देत अभिवादन केले आहे. मात्र आज या समाधीची अवस्था पाहून शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
समाधी परिसरात साफसफाईचा पूर्णतः अभाव असून वाढलेल्या झाडाझुडपांमुळे संपूर्ण परिसर झाकला गेला आहे. काही ठिकाणी संरचना तुटलेली दिसते, तर अस्वच्छतेमुळे परिसर ओसाड भासत आहे. समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्थित रस्त्याचीही सोय नसल्याने पर्यटक व इतिहासप्रेमींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच माहितीफलक, संरक्षणभिंत आणि मूलभूत सुविधा नसल्याने या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व अनेकांना कळत नाही.
शिवकालीन पराक्रमाची आठवण जपणाऱ्या या समाधिस्थळाचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. वडगाव नगरपंचायतीने तातडीने पुढाकार घेत योग्य रस्ता, संरक्षणभिंत, माहितीफलक तसेच नियमित साफसफाईची व्यवस्था करावी आणि या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करावे, अशी मागणी वडगावमधील इतिहासप्रेमी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















