मंत्रालयात आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने कट फ्लॉवर मार्केट उभारणीसंदर्भात सविस्तर बैठक
मुंबई : मावळ तालुक्याच्या फुलशेतीला जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागावे, या उद्देशाने मंत्रालयात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईतील दादर येथे अत्याधुनिक कट फ्लॉवर मार्केट उभारण्यासाठी झालेल्या या बैठकीत मंत्री मा. भरत गोगावले यांच्या सोबत आमदार सुनील शेळके उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मावळातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांवर आमदार सुनील शेळके यांनी मुद्देसूद चर्चा केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, निर्यातीसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच तांत्रिक मदत आणि जागतिक दर्जाचे मार्केटिंग नेटवर्क निर्माण व्हावे, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या वेळी आमदार महेश शिंदे, आमदार मनीषाताई चौधरी, कृषी विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी, मुंबई महानगरपालिकेच्या मार्केट विभागातील अधिकारी तसेच दादर कट फ्लॉवर असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
“मावळची फुलशेती ही या भागाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक स्तरावर योग्य न्याय मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत,” अशी ठाम भूमिका आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली.
या बैठकीनंतर मावळच्या फुलशेतीला नवे आयाम मिळण्याची दारे खुली झाली असून शेतकऱ्यांसाठी स्थिर, सुरक्षित व जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. मावळचा शेतकरी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.



















