वानप्रस्थाश्रमास सीएसआर योजनेअंतर्गत मदत
तळेगाव दाभाडे – चाकण औद्योगिक क्षेत्रातील बोंडीओली अॅन्ड पाॅवेसी या इटालियन कंपनीने आपल्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून तळेगाव दाभाडे येथील वानप्रस्थाश्रमास मौल्यवान साहित्य भेट दिले.
या साहित्यामध्ये कणकीपासून पोळ्या बनवणारे विजेचे यंत्र, संगणक, मुद्रक, कपाटे आदींचा समावेश असून या भेटीची एकूण किंमत सुमारे ३ लाख ५ हजार रुपये इतकी आहे. ही मदत कंपनीने सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) या योजनेअंतर्गत दिल्याची माहिती वानप्रस्थाश्रमाचे विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांनी दिली.
वानप्रस्थाश्रमातील वृद्धांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी ही मदत म्हणजे अल्प परंतु महत्त्वाची भेट असल्याचे कंपनीचे संचालक मनोज जोग यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी अनिल क्षीरसागर, राजेश सुतार, शितल साबळे, रवींद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विश्वस्त सौ. उर्मिलाताई छाजेड यांनी केले. आभारप्रदर्शन वानप्रस्थाश्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण मुळे यांनी केले. तर विश्वस्त सुरेश साखवळकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
या वेळी कंपनीच्या संचालकांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच वानप्रस्थाश्रमाच्या वतीने कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
(प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे)९९२१८०७०११




















