
मावळचा नेमबाज दया पारखी राष्ट्रीय पातळीवर झळकणार राज्य स्पर्धेत नेमबाजीची अचूकता दाखवत कांस्य व रौप्यपदकाची कमाई
उर्से (ता. मावळ) : मावळच्या सुपिक मातीतून पुन्हा एकदा अचूक नेम साधणारा शिलेदार घडला आहे.ओझर्डे (ता. मावळ) येथील युवा नेमबाज दया बाळासाहेब पारखी याने पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर नुकत्याच पार पडलेल्या ४०व्या महाराष्ट्र राज्य रायफल शूटिंग स्पर्धेत आपल्या नेमबाजीची अचूकता आणि धैर्याची झलक दाखवत राज्यभरातील नेमबाजांचे लक्ष वेधून घेतले आहे.


१२ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत दया पारखीने ५० मीटर प्रोन रायफल (ज्युनिअर गट) प्रकारात तब्बल ६०९ गुणांची झेप घेत कांस्यपदकावर नाव कोरले, तर ‘थ्री पोझिशन’ या अत्यंत तांत्रिक व संयमाची परीक्षा घेणाऱ्या प्रकारात रौप्यपदक मिळवून आपली नेमबाजी सिद्ध केली.
त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी दया पारखीची निवड झाली असून, मावळच्या तरुणाईसाठी हे एक प्रेरणादायी यश ठरले आहे.


दया पारखी यांना राज दाभाडे व स्नेहल दाभाडे या प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून ते लोणावळा रायफल शूटिंग अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. या अकॅडमीमार्फत ग्रामीण भागातील नेमबाजांना अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन नवी पिढी तयार करण्याचे कार्य सातत्याने केले जाते.
या उल्लेखनीय यशाबद्दल दया पारखी यांचा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, दया यांचे वडील बाळासाहेब पारखी, जे ओझर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, ते स्वतः एक कुशल नेमबाज असून त्यांनीही अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.


मावळच्या भूमीतून उगवलेल्या या नेमबाजाच्या यशाने संपूर्ण तालुका अभिमानाने डोळे भरून पाहत आहे.
शिस्त, एकाग्रता आणि चिकाटी या तीन गोष्टींच्या बळावर दया पारखीने घडवलेले हे यश मावळच्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०१५




















