मावळात भाजपा सोशल मीडियाची आक्रमक भूमिका – शेतकरी, रस्ते व ग्रामपंचायतीच्या समस्यांवर तहसीलदारांना निवेदन
वडगाव : मावळ तालुक्यातील वाढत्या समस्यांवर तोडगा निघावा यासाठी भाजपा सोशल मीडिया मावळ तालुका यांच्यावतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, रस्त्यांची दुरवस्था आणि ग्रामपंचायतीकडून डिजिटल दाखले उपलब्ध नसल्याची तातडीची समस्या मांडण्यात आली.
शेतकऱ्यांची हतबल अवस्था
निवेदनात म्हटले आहे की, भात पिकावर करपा रोगाने थैमान घालून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महिनेन्महिने कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहून शेतकरी वर्ग हताश झाला आहे. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी भाजपाकडून करण्यात आली.
रस्त्यांची दयनीय अवस्था
तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब असून दररोज अपघात होत आहेत. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामपंचायतींच्या डिजिटल सेवांचा प्रश्न
ग्रामपंचायतींकडून डिजिटल दाखले उपलब्ध न झाल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन सेवा वेळेवर मिळत नसल्याने गावकऱ्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे डिजिटल दाखले त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
भाजपा सोशल मीडियाचा इशारा
या सर्व मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा, धरणे आणि जनआंदोलन उभारण्याचा इशारा भाजपा सोशल मीडियाने प्रशासनाला दिला आहे. “शेतकरी व जनता एकटी नाही, भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ही लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरूच राहील,” असे मावळ मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी स्पष्ट केले.
तहसीलदारांचे आश्वासन
नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी निवेदन स्वीकारत वरील प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पंचनामे केले जातील व आवश्यक उपाययोजना करून समस्या सोडवली जाईल.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या वेळी भाजपा अंदर मावळ मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, मावळ तालुका माजी संयोजक रवी शिंदे, संतोष सातकर, समीर भोसले, संतोष असवले, विठ्ठल तुर्डे, करण गोणते, प्रतीक घोडेकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (९९२१८०७०११)




















