वडगावात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण; शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा अपेक्षित
वडगाव, ता. मावळ (जि. पुणे) – महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत वडगाव शहरासाठी राबविण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील शिंदेटेकडी जलशुद्धीकरण केंद्र (२ MLD) व संस्कृती जलशुद्धीकरण केंद्र (२ MLD) या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता माळीनगर येथील शिंदेटेकडी जलशुद्धीकरण केंद्र येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती सुनील गणेश ढोरे यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास अजय बाळासाहेब म्हाळसकर (गटनेता/नगरसेवक), दिनेश गोविंद ढोरे (गटनेता/नगरसेवक), अर्चना संतोष म्हाळसकर (नगरसेविका/विरोधी पक्षनेता), गणेश सोपान म्हाळसकर (सार्वजनिक बांधकाम सभापती), सुनिता राहुल ढोरे (महिला व बालकल्याण सभापती), पुनम विकी भोसले, रूपाली अतुल ढोरे, अजय महेंद्र भवार, आकांक्षा योगेश वाघवले, अनंता बाळासाहेब कुडे (पक्षप्रतोद), माया अमर चव्हाण (आरोग्य सभापती), रोहित मंगेश धडवले, विशाल वसंतराव वहीले, सारिका प्रशांत चव्हाण, वैशाली गौतम सोनवणे, राणी संतोष म्हाळसकर तसेच नगरसेवक पंढरीनाथ राजाराम ढोरे व संदीप भास्करराव म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी शिंदेटेकडी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हाळसकर कुटुंबियांचे विशेष आभार मानले. तसेच ठेकेदार ईगल इन्फ्रा, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम आणि वडगाव नगरपंचायत प्रशासनाने प्रकल्पाचे काम उत्कृष्ट दर्जाने व अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे कौतुक केले.
नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी आपल्या मनोगतात या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेळके यांचे आभार मानले. तसेच वडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सभापती सौ. माया अमर चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन पाणीपुरवठा सभापती सुनील गणेश ढोरे यांनी केले.
या नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पांमुळे वडगाव शहरातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.























