वडगावात हरवलेली २.५ तोळ्यांची सोन्याची चैन पोलिसांच्या सतर्कतेने परत
वडगाव (ता. मावळ) प्रतिनिधी: पौड (ता. मावळ) येथील रहिवासी परमेश्वर पांडुरंग पवार (वय ३५) यांची पत्नी यांच्या गळ्यातील सुमारे २.५ तोळे वजनाची सोन्याची चैन हरवल्यानंतर वडगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत ती शोधून काढत मूळ मालकिणीच्या ताब्यात दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पवार दांपत्य काल वडगाव येथे नातेवाईकांकडे आले होते. यावेळी पोटोबा मंदिर परिसरात फिरत असताना त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चैन नकळतपणे पडून हरवली. काही वेळाने ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ परिसरात शोध घेतला, मात्र चैन सापडली नाही.
यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका केळी विक्रेत्या महिलेच्या गाडीसमोर सदर चैन पडल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळातच एका महिला ग्राहकाने ती चैन उचलून नेल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक व पारंपरिक तपास पद्धतींचा अवलंब करून संबंधित संशयित महिलेचा शोध घेतला. तिची चौकशी केली असता तिच्याकडून २.५ तोळ्यांची सोन्याची चैन जप्त करण्यात आली आणि ती मूळ मालकिणीला परत करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, सहाय्यक उपनिरीक्षक अजित ननावरे, हवालदार आशिष काळे तसेच पोलीस कर्मचारी पतुरे, ढोले, भांगे, गोरे, राक्षे, ढमाले यांनी पार पाडली.
या घटनेमुळे वडगाव पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून नागरिकांकडून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.























