
वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : नामनिर्देशन प्रक्रियेला वेग — आजपर्यंत ५ अर्ज दाखल
वडगाव, दि. 15 : मा. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरूवात झाली असून, आजपर्यंत उमेदवारी सादरीकरणाला वेग मिळताना दिसत आहे.


निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी वडगाव नगरपंचायत कार्यालयात एकूण 5 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 1 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 4 अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
नगरसेवक पदासाठी खालील उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे सादर केली—
योगेश सतीश तुमकर – प्रभाग क्र. 3
रेखा विलास दंडेल – प्रभाग क्र. 5
भाग्यश्री सतीश गाडे – प्रभाग क्र. 5
चंद्रजित दिनकर वाघमारे – प्रभाग क्र. 7


निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2025 हा शेवटचा दिवस असून फक्त दोन दिवसांची मुदत शिल्लक आहे. शेवटच्या टप्प्यात संगणक प्रणालीवर वाढत्या भाराची शक्यता लक्षात घेऊन आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी या उद्देशाने आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या तीन दिवसांमध्ये,
तसेच रविवार, दि. 16 नोव्हेंबर हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असला तरी,
दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत
उमेदवारांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.


निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, दुपारी 3.00 वाजेपूर्वी उमेदवार नामनिर्देशन कक्षाच्या प्रवेशद्वाराच्या आत असणे बंधनकारक असून, त्यानंतर येणाऱ्यांची नोंद घेता येणार नाही.
वडगाव नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी दाखल प्रक्रियेला आता गती मिळत असून, शेवटच्या दोन दिवसांत अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















