शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देहूमध्ये रोहित पवारांचे उपोषण. सरकारला जागवणार लढा
देहू : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, या ठाम मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी २० ऑक्टोबर रोजी देहू येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पवित्र भूमीचे त्यांनी दर्शन घेऊन उपोषणास प्रारंभ केला. या आंदोलनात वारकरी आघाडीचे प्रमुख दत्ता महाराज दोन्हे (पाटील )यांनीही सहभाग घेतला आहे.

जगद्गुरू संत तुकोबांच्या प्रवेशद्वारासमोर पवारांनी शांततेत, पण निर्धाराने उपोषण सुरू केले. “शेतकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी हाच एकमेव मार्ग आहे,” असे सांगून पवारांनी सरकारकडे थेट आवाहन केले. “शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.


सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे जगणे उद्ध्वस्त केले. शेतजमिनी वाहून गेल्या, जनावरं मरून गेली, तर पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटींच पॅकेज हे केवळ कागदावरच राहिले असून शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही, असा आरोप रोहित पवारांनी केला.
रोहित पवार पुढे म्हणाले.आज शेतकरी उपाशी, विवश आणि कर्जाच्या दलदलीत बुडाला आहे. अशा वेळी सरकारने मोठमोठ्या घोषणांऐवजी थेट कृती करावी. अशी आमची स्पष्ट मागणी आहे .राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. ही फक्त आमदार रोहित पवारांची नव्हे, तर लाखो शेतकऱ्यांची हाक आहे.


या उपोषणादरम्यान अनेक वारकरी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांच्या नामस्मरणात वातावरण भारले होते. वारकरी संप्रदायातील प्रमुखांनी पवारांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला.
पवारांनी या प्रसंगी जाहीर केले की, “आम्ही लवकरच ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजना’ राज्य सरकारला सादर करणार आहोत. या योजनेत शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्याबरोबरच नवीन कर्जासाठी सुलभ प्रक्रिया आणि विमा संरक्षणाचा समावेश असेल.


शेतकऱ्यांच्या हितासाठी हा संघर्ष असून राजकारण करण्यासाठी नव्हे, असे पवारांनी स्पष्ट केले. “सरकारने शेतकऱ्यांचा आवाज ऐकला नाही, तर आम्ही या लढ्याला राज्यभर नेऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
देहूमध्ये सुरू असलेल्या या उपोषणामुळे परिसरात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक संघटना, स्थानिक नेते आणि तरुण कार्यकर्ते पवारांच्या या आंदोलनात सहभागी होत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या भूमीतून निघालेला हा आवाज आता राज्यभर गुंजण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्य सरकारकडून या उपोषणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, पवारांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता नव्याने राजकीय वातावरण तापणार यात शंका नाही.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















