श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे गणेशोत्सव मंडळाचा आकर्षक देखावा
भाजे (ता. मावळ) : भाजे येथील श्री शिवाजी उदय मित्र मंडळ यांच्याकडून यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेला आकर्षक देखावा सर्व गणेशभक्तांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला आहे. यंदा नुकत्याच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेल्या महाराष्ट्र व कर्नाटकातील मराठा साम्राज्यातील १२ दुर्गांचा विषय मंडळाने आपल्या देखाव्यासाठी निवडला होता. विशेष म्हणजे, यामध्ये मावळ तालुक्याचा अभिमान असणाऱ्या लोहगड किल्ल्याचा देखील समावेश आहे.
या देखाव्यात सर्व १२ किल्ल्यांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच लोहगड-विसापूर दुर्ग संवर्धनासाठी गेली २५ वर्षे अविरत कार्यरत असलेल्या “लोहगड विसापूर विकास मंचा”चे विशेष गुणगौरव करण्यात आला. मंचाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांना गणेश आरतीचा मान देण्यात आला.
मंचाचा दुर्गसंवर्धनातील मोलाचा वाटा
मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी या कार्याचा आढावा घेताना सांगितले की,
ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील जीर्ण झालेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार सर्वप्रथम करण्यात आला.
यानंतर महाशिवरात्री यात्रा पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली.
भारतीय पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून लोहगडावर नवीन गणेश दरवाजा बसविण्यात आला.
गडाचे दरवाजे आता संध्याकाळी पाच वाजता बंद केले जात असल्याने गैरप्रकारांना आळा बसला आहे.
पायऱ्या, तटबंदी, बुरुज अशा विविध दुरुस्तीची कामे पुरातत्व विभागाने हाती घेतली आहेत.
गड पायथ्याशी भव्य शिवस्मारक उभारणी करण्यात आली असून ते शिवभक्तांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
मंचाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज लोहगड दुर्गाचे स्वरूप बदलत असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्याही सहकार्याने हे संवर्धनकार्य अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे.
उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते
या कार्यक्रमाला मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, कार्यकर्ते संदीप गाडे, बसप्पा भंडारी, सागर कुंभार, सचिन निंबाळकर, अनिकेत आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर मंडळाच्या देखाव्याचे नियोजन अभिजित काळे, ऋषिकेश, रितेश, सतीश गाडे, विठ्ठल नगिने व सहकाऱ्यांनी केले होते.
मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक
श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे यांनी गणेशोत्सवातील देखाव्याद्वारे दुर्ग संवर्धनाच्या कार्याची दखल घेतली, ही बाब खरोखरच अभिमानास्पद असल्याचे मत मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्व गणेशभक्त व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)



















