
हरवलेले मोबाईल परत मिळताच समाधानाची लाट; देहूरोड पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम
देहूरोड : हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सीआईआर (Centralized Equipment Identity Register) या अत्याधुनिक पोर्टलचा देहूरोड पोलिसांनी प्रभावी वापर केला आहे. या उपक्रमाद्वारे नुकत्याच घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात तब्बल ३६ हरवलेले मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मोबाईल हातात पडताच नागरिकांच्या चेहऱ्यावरचे समाधान गगनात मावेनासे झाले.


आजच्या डिजिटल काळात मोबाईल हरवणे म्हणजे केवळ एक इलेक्ट्रॉनिक साधन निघून जाणे नव्हे; तर जपलेले फोटो, महत्त्वाची कागदपत्रे, वैयक्तिक संपर्कांची नोंद, आणि अनेक आठवणी
…हे सर्वकाही गमावण्यासारखे असते. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध लावून देणे नागरिकांसाठी दिलासा देणारी व महत्त्वाची सेवा ठरते.
स्टार हॅश ०६ हॅश डायल करून मिळणारा IMEI क्रमांक सीआईआर पोर्टलवर नोंदवला जातो. यानंतर तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा मागोवा घेऊन स्थानिक पोलिस तपास सुरू करतात.


देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवणे व चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून सीआईआर पोर्टलचा वापर करून व्यापक तपास करण्यात आला. या तपासात कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल ७० मोबाईल शोधण्यात देहूरोड पोलिसांना यश मिळाले.
बुधवारी सायंकाळी ५ वाजता देहूरोड पोलिस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते ३६ नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. या वेळी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधानाचा प्रकाश झळकत होता.


ही संपूर्ण मोहीम चाकण-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
पोलिस उपायुक्त विशाल गायवाड, सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे, सहायक पोलिस निरीक्षक अक्षय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ऐश्वर्य राऊत, कॉन्स्टेबल मयूर धागरे तसेच इतर कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
हरवलेल्या मोबाईलची परतफेड केल्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. देहूरोड पोलिसांनी तंत्रज्ञानाचा केलेला प्रशंसनीय वापर आणि तत्पर कारवाई नागरिकांचे मन जिंकणारी ठरली.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















