गंहुजे मावळ : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
गंहुजे (ता. मावळ) : मावळ तालुक्यातील गंहुजे येथे शनिवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत देहूरोड येथील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. रोहन रॉय (वय 20, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड परिसरातील तिघे मित्र शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास गंहुजे येथील पवना नदी परिसरात पोहण्यासाठी गेले होते. या तिघांमध्ये रोहन रॉय हाही होता. नदीत पोहत असताना तिघेही मधोमध गेले असता पाण्याची खोली जास्त असल्याने रोहनचा तोल गेला आणि तो अचानक बुडाला.
सोबतच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्नांना यश आले नाही. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती शिरगाव–परंदवडी पोलिस ठाणे तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना दिली.

सूचना मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले, तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे स्वयंसेवक निलेश गराडे, गणेश गायकवाड, अनिश गराडे, राजू बांडगे, विनय सावंत, भास्कर माळी (मामा), कमलेश राक्षे, अनिल आंद्रे, हिरामण आगळे आणि प्रतीक कुंभार यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रोहनचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले.

शिरगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वायसीएम रुग्णालय, पिंपरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गंहुजे व देहूरोड परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास परंदवडी पोलिस करीत आहेत.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. 9921807011)




















