श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन २० ऑक्टोबर रोजी
तळेगाव दाभाडे: मावळ तालुक्यातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणून ओळखली जाणारी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या मुख्य कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे खजिनदार अमित अरुण भसे यांनी दिली.

पतसंस्थेच्या तळेगाव दाभाडे, कामशेत, देहू आणि सोमाटणे या शाखा यशस्वीरित्या कार्यरत आहेत. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद, संस्थेची सातत्यपूर्ण प्रगती आणि पारदर्शक व्यवहार यामुळे संस्थेने अल्पावधीतच उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. या यशाचा पुढचा टप्पा म्हणून नव्याने बांधलेल्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे व मदन बाफना, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब भेगडे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील, मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, तसेच पुणे जिल्हा नागरी सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षा रेशमा भोसले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे, संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, तसेच सर्व संचालक मंडळ, सभासद व मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या प्रगतीचा हा नवा अध्याय मावळ तालुक्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.

पतसंस्थेने स्थापनेपासून समाजाभिमुख दृष्टीकोन स्वीकारत शेतकरी, व्यापारी, लघुउद्योगिक आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि ग्राहकसेवा या त्रिसूत्रीवर उभ्या असलेल्या या संस्थेने मावळ परिसरात सहकार क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या सोहळ्याला सर्व सभासद, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे आधारस्तंभ व माजी नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले आहे.
या उद्घाटन सोहळ्याने श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असून, संस्थेचा “सहकारातून सर्वांगीण विकास” हा ध्यास अधिक बळकट होणार आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















