कोथुर्णे येथे नवीन पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी
पवनानगर: कोथुर्णे व परिसरातील ग्रामस्थांनी नुकतीच आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पवना नदीवरील नवीन पूल उभारण्याची मागणी केली. काले कॉलनी ते कोथुर्णे या मुख्य रस्त्यावरील पूल अत्यंत जीर्ण झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
सन १९९० मध्ये बांधण्यात आलेला हा पूल कोथुर्णे, मळवंडी ठुले, वारू या गावांना जोडणारा मुख्य आणि जवळचा रस्ता होता. मात्र, पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाल्याने प्रशासनाने तो बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी शाळकरी मुले, शेतकरी तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे.
ग्रामस्थांच्या निवेदनानंतर आमदार सुनील शेळके यांनी तत्काळ जिल्हा परिषद बांधकाम विभागाशी संपर्क साधला. सदर पुलाची सद्यस्थिती जाणून घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या तसेच नवीन पूल उभारणीसाठी आवश्यक अंदाजपत्रक तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आमदार शेळके म्हणाले,
“भविष्यातील वाढत्या वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल व त्यास जोडणारा रस्ता किमान ७.५० मीटर रुंदीचा केला जाईल. यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंचे शेतकरी कोणताही अडथळा न आणता सामंजस्याने जागा अधिग्रहणासाठी सहकार्य करावे, म्हणजे हा विकासकामाचा मार्ग सुकर होईल.”
ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उपस्थितांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे – ९९२१८०७०११






















