मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाला लोणावळा ग्रामीण भागातून शिधा पाठवणी
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आज तिसरा दिवस उजाडला. लाखो मराठा बांधव या ठिकाणी एकवटले असून, “आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही” असा ठाम निर्धार त्यांनी जाहीर केला आहे.
मुंबईकर आणि मराठा संघटनांनी आंदोलकांच्या जेवणाच्या व्यवस्थेत हातभार लावला असला, तरी मागील दोन दिवसांत अनेक दुकाने व हॉटेल्स बंद झाल्याने अन्न-पाण्याची टंचाई जाणवू लागली. या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण भागातील कार्ला-मळवली परिसरातील गावांनी आंदोलकांच्या मदतीसाठी मोठा पुढाकार घेतला आहे.
गावागावातून अन्नधान्याची जमवाजमव
कार्ला, वेहरगाव, शिलाटणे, दहिवली, टाकवे, वाकसई, देवघर, पाटण, मळवली, देवले, भाजे, सदापूर, बोरज, ताजे, पाथरगाव, पिंपळोली या गावांतील ग्रामस्थांनी एकजुटीने शिधा पाठविण्याचा निर्णय घेतला. महिला भगिनींनी प्रत्येक घरातून २० ते २५ चपात्या व शेंगदाणे मिरचीची चटणी बनवून गावातील मराठा संयोजकांकडे दिल्या.
सुमारे ५,००० आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून ग्रामस्थांनी १५,००० चपात्या, १०० किलो शेंगदाणे मिरचीची चटणी, लोणची, ५००० पाण्याचे बॉक्स, १०० किलो फरसाण, ५०० बिस्किटांचे बॉक्स, २० किलो राजगिरा लाडू यांसह तांदूळ, डाळ, इतर किराणा माल गोळा करून मुंबईकडे रवाना केला.
‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणांनी दणाणले गाव
मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाने एकदिलाने या उपक्रमात सहभाग घेतला. तरुणाई व ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन गावागावांत “एक मराठा, लाख मराठा”च्या घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. महिलांच्या हातचे जेवण आणि ग्रामीण बांधवांचा उत्साह पाहून आंदोलनासाठी लोकसहभागाची ताकद अधोरेखित झाली.
सरकारकडे ठाम मागणी
ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला की, “मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी तातडीने मान्य करावी. अन्यथा राज्यभरातील मराठा समाज असंतोष व्यक्त करेल आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.”
मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला ग्रामीण भागातून मिळणारा हा शिधा केवळ अन्नधान्यापुरता मर्यादित नसून, तो मराठा समाजाच्या एकतेचा आणि हक्कासाठीच्या लढ्याचा पुरावा असल्याचे बोलले जात आहे.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे, ९९२१८०७०११



















