खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून मैदान व उद्यान सुशोभीकरणासह विविध कामांना गती
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील विकासकामांना गती मिळत असून खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून वडगाव आणि तळेगाव दाभाडे येथे तब्बल दोन कोटी दहा लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) करण्यात आला.

या भूमिपूजन सोहळ्याला आमदार सुनील शेळके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, महिला जिल्हा संघटिका शिलाताई भोंडवे, युवासेना तालुका प्रमुख राजेश वाघोले, शिवसेना शहर प्रमुख देवा खरटमल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तळेगाव दाभाडेतील यशवंतनगर परिसरातील गोळवलकर गुरूजी मैदान व उद्यान सुशोभीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यासाठी खासदार बारणे यांनी ५० लाखांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासोबतच इतर विकासकामांसाठी आणखी ५० लाखांचा निधी देऊन तळेगावात एक कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. तर वडगाव नगरपरिषदेच्या क्षेत्रात तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
वडगाव येथील कार्यक्रमाला नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, भाजप मावळ प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, पोटोबा देवस्थान समितीचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर भोसले, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी नगरसेवक सुनील ढोरे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, माजी नगरसेवक प्रविण चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
“मावळच्या जनतेने तीनही निवडणुकीत मला मताधिक्याने पाठिंबा दिला. त्यातून उतराई होण्यासाठी मी मावळला सर्वाधिक निधी दिला आहे. अंतर्गत रस्ते, मैदाने, उद्याने विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. महायुती सरकार विकासासाठी ठाम असून कोणत्याही कामात राजकारण न आणता सर्वांनी मिळून जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत,” असे खासदार बारणे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. देहूरोड वायजंक्शन ते वाकडपर्यंतच्या रस्त्याला गती मिळाली आहे.
‘अमृत भारत’ योजनेअंतर्गत रेल्वे स्थानके अत्याधुनिक करण्यात येत आहेत. लोणावळा-पुणे तिसरा व चौथा ट्रॅक या कामावर सरकार सकारात्मक असून राज्य शासनाने नुकतीच आपला हिस्सा मंजूर केला आहे.
“खासदार बारणे यांच्या प्रयत्नातून व निधीतून मावळ विधानसभेत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू झाली आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून भविष्यातही प्रलंबित कामे मार्गी लावली जातील. विकासासाठी आपण नेहमीच एकत्र राहून काम करू,” असे आमदार शेळके म्हणाले.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे | मो. ९९२१८०७०११



















