
बोर घाटात जंगली रानरेड्याचा वावर; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण
लोनावळा : निसर्गसौंदर्य आणि घाटातील निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जाणारा बोर घाट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे .कारण गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात जंगली रानरेड्याचा वावर दिसून येत आहे. मुंबई–पुणे महामार्गालगतच्या कार माळ परिसरात हा विशाल वन्यप्राणी फिरताना आढळल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्थानिक रहिवासी आणि काही वाहनचालकांनी या रानरेड्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये रानरेडा झुडपांमधून शांतपणे रस्ता ओलांडताना आणि जवळच्या डोंगरउतारांवर हिंडताना दिसतो. जंगली प्राण्यांच्या उपस्थितीने पर्यावरणप्रेमींमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
वन विभागाचे अधिकारी सांगतात की, हा रानरेडा कदाचित भोर–लोणावळा परिसरातील दाट जंगलातून भटकत बोर घाट भागात आला असावा. सध्या वनरक्षकांची पथके सतत गस्त घालत असून, वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


बोर घाट विभागात वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा. रात्रीच्या वेळी हाय बीमचा अतिरेकी वापर टाळावा. वन्य प्राणी समोर आल्यास गाडी थांबवून हॉर्न वाजवू नये किंवा त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये.
वन विभागाने पुढील काही दिवस या परिसरात वन्यजीव निरीक्षण मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे. तसेच, संबंधित रानरेड्याला सुरक्षितपणे पुन्हा जंगलात परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


या घटनेमुळे पुन्हा एकदा मानव–वन्यजीव सहअस्तित्वाचा प्रश्न समोर आला आहे. नागरीकरणाचे वाढते प्रकार आणि जंगल पट्ट्यांच्या संकुचित होणाऱ्या सीमांमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे.
बोर घाटातील हा प्रसंग केवळ एक बातमी नाही, तर निसर्गाच्या अधिवासाचा सन्मान राखण्याची आठवण आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















