वडगाव नगरपंचाय निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप आमनेसामने – नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत
वडगाव मावळ │ वडगाव नगरपंचाय निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात थेट आणि चुरशीची लढत सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा प्रश्न मानत ही निवडणूक जोरदार लढविण्याचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार अबोली मयूर ढोरे निवडणूक रिंगणात आहेत. मागील काही वर्षांत केलेल्या विकासकामांचा मुद्दा घेत आणि आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वातील विविध उपक्रमांची नोंद मांडत राष्ट्रवादी काँग्रेस ‘विकास हा मुख्य एजेंडा’ ठेवून मतदारांपर्यंत पोहोचत आहे. शहरातील मूलभूत सुविधा, महिलांसाठी राबवलेले उपक्रम, क्रीडा प्रोत्साहन आणि नागरी विकास यावर आधारलेली मोहीम सध्या वेगाने सुरू आहे.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाकडून मृणाल गुलाबराव म्हाळसकर या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार असून पक्षाने निवडणूक थेट नेतृत्वाच्या चेहऱ्यावर लढविण्याची रणनीती स्वीकारली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची छाप मतदारांपर्यंत पोहोचवत भाजप आपला प्रचार उभारते आहे. केंद्री योजनांचा लाभ, पारदर्शक कारभार आणि स्थिर नेतृत्व ही भाजपची प्रमुख मांडणी ठरत आहे.
दोन्ही पक्षांकडून शहरभर प्रचारयंत्रणा वेगाने कार्यरत असून घरोघरी भेटी, सभा, पदयात्रा यांमुळे वडगाव शहरात राजकीय उर्जा वाढली आहे. नागरिकांकडून दोन्ही उमेदवारांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता निवडणूक काट्याची होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
आगामी काही दिवसांत प्रचाराचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून वडगावचे राजकारण या दुतर्फा संघर्षामुळे अधिक रंगतदार झाले आहे. अंतिम निर्णय मात्र मतपेटीतूनच समोर येणार असून त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.




















