
हरित भविष्याचा संकल्प! रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांचा पर्यावरणपूरक सत्कार
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये नवनिर्वाचित मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांचा रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला. पारंपरिक पुष्पगुच्छ व सन्मानचिन्हांना फाटा देत तुळस रोप व कापडी पिशवी देऊन केलेल्या या सत्काराने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, हरित तळेगाव आणि शाश्वत विकासाचा प्रभावी संदेश देण्यात आला. वाढते प्रदूषण, प्लास्टिकचा वाढता वापर आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. रोटरी क्लबने केवळ सामाजिक कार्यापुरते न थांबता पर्यावरण जपणुकीचा आदर्श निर्माण केल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने सांगण्यात आले की, येणारा काळ तळेगावकरांसाठी केवळ “गोल्डन सुवर्ण भविष्याचा” ठरावा, हीच सर्वांची सामूहिक भावना आहे. विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून नगरपरिषद, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे साध्य होऊ शकते, असेही मत व्यक्त करण्यात आले.


यावेळी बोलताना गोल्डन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी म्हणाले की,
“आजचा सत्कार हा केवळ अभिनंदनाचा औपचारिक कार्यक्रम नसून पर्यावरण जतन व संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम आहे. विकासाच्या वाटेवर पुढे जात असताना निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. हरित तळेगाव, स्वच्छ तळेगाव आणि शाश्वत विकास हेच आमचे ध्येय असून नगरपरिषद, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तळेगाव दाभाडेचे सुवर्ण भविष्य घडवूया.


या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी, उपाध्यक्ष रो. प्रशांत ताए, सचिव रो. प्रदीप टेकवडे, ॲडमिन रो. बसप्पा भंडारी, रो. दिनेश चिखले, रो. अमेय झेंड तसेच क्लबचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहकार्याची ग्वाही दिली.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रोटरी क्लबच्या या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. नगरपरिषद व विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने तळेगाव दाभाडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छता, हरितीकरण आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देत काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरणपूरक सत्कार हा केवळ एक कार्यक्रम न राहता शहरासाठी एक सकारात्मक दिशा ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























