
शिवरथ यात्रेच्या साक्षीने तळेगावात शिवभक्तीचा जागर. क्रिकेटपटू आदित्य माने यांचे शिवकार्यास योगदान
तळेगाव दाभाडे : शिवइतिहासाची जाज्वल्य आठवण, शिवविचारांची प्रेरक मशाल आणि समाजमनात चेतना जागवणारा सोळावा शिवरथ यात्रोत्सव तळेगाव दाभाडे शहरात दिमाखात साजरा झाला. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ किल्ले रायगड या पवित्र प्रवासातील शिवरथ यात्रेचे दुपारी चारच्या सुमारास श्री शिवशंभू तीर्थ येथे आगमन होताच अवघा परिसर शिवनामघोषांनी निनादून गेला. भगव्या पताका, ढोल-ताशांचा गजर आणि जय शिवराय च्या गर्जनांनी तळेगावात जणू शिवकालीन तेज अवतरले.


दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली ही शिवरथ यात्रा परंपरेचा सोळावा अध्याय ठरली. ६ फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवजन्मस्थानाचे विधिवत पूजन करून यात्रेला प्रारंभ झाला. नारायणगाव, देहू मार्गे ऐतिहासिक वाटचाल करत ही यात्रा तळेगाव दाभाडे येथे दाखल झाली. इतिहास, संस्कार आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असलेली ही यात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री शिवशंभू तीर्थ येथे झालेल्या स्वागत समारंभात डॉ. प्रमोद बोराडे, डॉ. प्रवीण माने, नगरसेवक चिराग खांडगे, विनीत भेगडे, शैलेश जाधव, सचिन ढमाले, आकाश ठोंबरे, स्मारक समितीचे सदस्य तसेच असंख्य शिवभक्त उपस्थित होते. डॉ. प्रमोद बोराडे यांनी पालखीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून शिवरथ यात्रेचा गौरवशाली इतिहास उलगडून सांगितला. ही यात्रा म्हणजे केवळ प्रवास नसून, शिवविचारांची चालती-बोलती शाळा आहे, असे त्यांनी नमूद केले.


यात्रेचे आयोजक सचिन शेडगे यांनी आपल्या मनोगतात यात्रेचे सामाजिक अधिष्ठान अधोरेखित करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे राष्ट्रनिर्मितीचे विचार आणि स्वराज्याची मूल्ये प्रत्येक गावागावात पोहोचावीत, हाच या यात्रेचा मूळ उद्देश आहे. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने गगनभेदी घोषणा देत वातावरण भारावून टाकले.


या शिवमय सोहळ्याला विशेष भावनिक आणि प्रेरणादायी कोंदण लाभले ते तळेगावचे सुपुत्र व उभरते क्रिकेटपटू आदित्य प्रवीण माने यांच्या शिवकार्यावरील योगदानामुळे. गुजरात येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय क्रिकेट स्पर्धेत मिळालेले मानधन त्यांनी शिवकार्यास अर्पण करून सामाजिक भान आणि शिवनिष्ठेचा आदर्श घालून दिला. खेळाच्या मैदानावर चमकणारी गुणवत्ता आणि समाजकार्याच्या अंगणात झळकणारी शिवभक्ती यांचा संगम त्यांच्या कृतीतून दिसून आला.

क्रिकेटसारख्या आधुनिक क्रीडाक्षेत्रात यश मिळवूनही शिवसंस्कारांची नाळ न तुटू देणाऱ्या आदित्य माने यांच्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. युवकांनी शिवविचार आत्मसात करत सामाजिक जबाबदारी जपावी, हा संदेश त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला.
शिवभक्तीचा जागर, इतिहासाची जाणीव आणि युवा पिढीसाठी प्रेरणास्तंभ ठरलेली ही शिवरथ यात्रा तळेगाव दाभाडेकरांच्या स्मरणात दीर्घकाळ कोरली जाणार असून, शिवकार्य हीच खरी शिवसेवा हा मंत्र पुन्हा एकदा जनमानसात ठसवून गेली.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११



















