महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज–जाखमाता बहिण-भावाची पारंपरिक भेट उत्साहात
वडगाव : ग्रामदैवत तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज व सांगवी येथील जाखमाता यांची दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी पारंपरिक बहिण-भावाची भेट यंदाही भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली. या सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी ग्रामदैवत पोटोबा महाराजांची पालखी सांगवी येथील जाखमाता मंदिरात नेण्यात आली. पोटोबा महाराजांच्या पालखीबरोबर वडगाव येथील भजनी मंडळाने टाळ-मृदंगाच्या गजरात अखंड भजन सादर केले. “जय जय राम कृष्ण हरी” च्या घोषात वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिर परिसरात धार्मिक विधी, पूजन आणि पारंपरिक कार्यक्रम पार पडले.
या सोहळ्यामुळे भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेली ही परंपरा जपली जात असून गावकऱ्यांमध्ये श्रद्धा आणि एकोपा वाढीस लागतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, सुभाषराव जाधव, भास्करराव म्हाळसकर, तुकाराम काटे, तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, अशोक ढमाले, सुनिता कुडे तसेच वडगाव व सांगवी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने पार पडलेला हा पारंपरिक सोहळा भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम ठरला.




















