वडगाव मावळात धुलिवंदनानिमित्त दगडी गोटी उचलण्याच्या शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन
वडगाव मावळ : जय बजरंग तालीम ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धुलिवंदनाच्या दिवशी पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळ असलेल्या दगडी गोटी उचलण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. ३ मार्च रोजी संपन्न होणार असल्याची माहिती जय बजरंग तालीम ट्रस्टचे अध्यक्ष उमेश ढोरे यांनी दिली.
हा कार्यक्रम श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आला असून आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख आणि मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
शिवकालीन परंपरेतून सुरू असलेल्या या मर्दानी खेळाला स्पर्धात्मक स्वरूप देण्यात आले असून यामध्ये वरिष्ठ गट आणि कुमार गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. वरिष्ठ गटातील प्रथम क्रमांकासाठी उद्योजक अतुल वायकर यांच्या वतीने, तर द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य अरुण वाघमारे यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
कुमार गटासाठी उद्योजक अक्षय बेल्हेकर, विनायक लवंगारे आणि गणेश झेरेकर यांच्या वतीने प्रथम तीन क्रमांकांसाठी चषक प्रदान करण्यात येणार आहेत.
गतवर्षी शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसाकर यांनी तब्बल ३२१ बैठका मारत विक्रम नोंदवला होता, तर कुमार गटात विराज वाघवले यांनी ३०१ बैठका मारून प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदा हा विक्रम कोण मोडणार याकडे मावळवासीयांचे लक्ष लागले आहे.




















