वडगाव येथे उद्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर”; नागरिकांना १५ हून अधिक महसुली सेवा एकाच छताखाली उपलब्ध

वडगाव मावळ : महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण व्हावे, जनतेच्या तक्रारी तत्काळ निकाली निघाव्यात तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान व्हावे या उद्देशाने राज्यभर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वडगाव शहरात शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शासकीय विश्रामगृह, वडगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तहसील कार्यालय, मावळ आणि वडगाव नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेषतः जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, झोन दाखला, मालमत्ता कर उतारा, थकबाकी नसल्याचा दाखला, प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील नाव दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र यांसह विविध दाखल्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
तसेच अकृषिक (NA) परवानगी, अकृषिक तरतुदींविषयी मार्गदर्शन, नवीन व्यवस्थेनुसार ‘सनद’ प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज प्रक्रिया, अॅग्री स्टॅक व पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी संदर्भातील कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कामेही करण्यात येणार आहेत.
याशिवाय रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड संदर्भातील कामकाज देखील शिबिरस्थळी केले जाणार असून नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची वेळ आणि प्रशासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांची बचत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष्या अबोलीताई ढोरे तसेच मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी केले आहे.






















