तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत!
सर्वसाधारण पुरुष आरक्षणामुळे अनेक दिग्गजांची रस्सीखेच – महायुती एकत्र येणार का?
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी):तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्ष पदाचे सर्वसाधारण (पुरुष) आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गज नेते आणि इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहेत.

या पदासाठी संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील), किशोर छबुराव भेगडे, संतोष मारुती भेगडे, आणि गणेश मोहनराव काकडे हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. सर्वच उमेदवारांचा स्थानिक जनाधार आणि राजकीय पातळीवर मजबूत प्रभाव असल्याने आगामी निवडणुकीत चुरशीची लढत अपेक्षित आहे.

दरम्यान, तळेगावमधील सर्वांचे लक्ष आता एका प्रश्नावर केंद्रीत झाले आहे —
महायुतीतील आमदार सुनील शेळके, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, आणि ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे हे एकत्र येणार का?
जर हे तीन नेते एकाच व्यासपीठावर आले, तर निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
मात्र, सध्याच्या घडीला प्रत्येक गट आपापले गणित मांडताना दिसत असून, आगामी काही दिवसांत तळेगावचे राजकारण रंगतदार वळण घेणार आहे. पक्षीय आघाड्या, स्थानिक पातळीवरील गटबाजी, आणि नवे उमेदवार या सगळ्यामुळे शहरातील निवडणूक अत्यंत रोमहर्षक ठरणार आहे.

नागरिकांच्या दृष्टीने पाणीपुरवठा, वाहतूक, शहर स्वच्छता आणि वाढती लोकसंख्या हे प्रश्न केंद्रस्थानी असतील. राजकीय समीकरणे कशी जुळतात आणि कोणत्या गटाकडे मतदारांचा कल झुकतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




















