प्रेरणादायी सुविचारांचं तळेगावात प्रथमच प्रदर्शन
तळेगाव दाभाडे शहरातील कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत प्रेरणादायी सुविचारांचं अनोखं प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाचा उद्देश नागरिकांना जीवनमूल्यांची जाणीव करून देत सकारात्मक विचारांची प्रेरणा देणे हा आहे.
या प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक अंबर चे संपादक सुरेश साखवळकर उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
मनुष्याला दैनंदिन जीवनात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. अशा वेळी प्रेरणादायी सुविचार मानसिक बळ देतात. त्याचाच विचार करून प्रा. राजेंद्र भिकन पवार यांनी हे आगळंवेगळं प्रदर्शन आयोजित केले आहे.
यशाचा मंत्र, सुखाचा मंत्र, एक वास्तव, एक प्रश्न, एक सत्य, एक चूक, एक खंत, चिंतन अशा विविध सदरांतून मानवी जीवनमूल्यांवर आधारित सुविचार मांडले जाणार आहेत.
एकूण १०८ प्रेरणादायी सुविचार या प्रदर्शनात प्रदर्शित केले जाणार आहेत. प्रेम, मैत्री, नातेसंबंध, सुख-दुःख, यश-अपयश, विचार-भावना, कृती अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे सुविचार येथे पाहायला मिळतील.
अपेक्षित फायदे
या प्रदर्शनातून प्रेक्षकांना खालील फायदे होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे –
1. सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळेल.
2. स्वतःची स्वतःबरोबर वेगळी ओळख निर्माण होईल.
3. मानवी जीवनमूल्यांचे सामर्थ्य समजेल.
प्रदर्शनासाठी सर्व नागरिकांनी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रा. राजेंद्र पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९६०४६२५३२० या क्रमांकावर संपर्क साधावा.
(प्रतिनिधी: गणेश नामदेव भेगडे) –९९२१८०७०११



















