मावळातील गिधाडांची घटती संख्या चिंताजनक : गिधाड संवर्धनासाठी वेळीच पावले उचलण्याचे आवाहन
पक्षी अभ्यासक अविनाश नांगरे यांचे मत
तळेगाव दाभाडे : गिधाड म्हटले की लोकांच्या मनात कुरूपता, क्रौर्य आणि भीतीची प्रतिमा उभी राहते. मात्र प्रत्यक्षात गिधाड हा निसर्गाचा महत्त्वाचा “स्वच्छता कर्मचारी” आहे. मृत जनावरांचे मांस खाऊन तो निसर्गातील घाण साफ करतो. परंतु आज हा उपयुक्त पक्षी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, अशी खंत तळेगावातील सुप्रसिद्ध पक्षी अभ्यासक अविनाश नांगरे यांनी व्यक्त केली.
कधीकाळी मावळ तालुक्यातील विसापूर, लोहगड, राजमाची, कल्हाट, निगडे आदी डोंगरकपारीत गिधाडांचे थवे पाहायला मिळत होते. परंतु सध्याच्या घडीला मोजकी दोन-तीनच गिधाडे क्वचितच दिसतात. या चिंताजनक घटेमागील कारणांवर प्रकाश टाकताना नांगरे यांनी सांगितले की –
डायक्लोफेनॅक औषधाचा दुष्परिणाम : मृत जनावरांचे मांस खाल्ल्यानंतर गिधाडांना विषबाधा होते.
अधिवास नष्ट होणे : वाढते शहरीकरण, खाणकाम, वास्तू विकास यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत.
प्रजननातील अडचणी : गिधाड वर्षाला केवळ एकच अंडे घालते. परंतु अंडी शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतात किंवा स्फोटकाच्या आवाजामुळे नष्ट होतात.
अन्नाची कमतरता : जनावरे थेट कसायांकडे पाठवली जात असल्याने गिधाडांना अन्न मिळणे अवघड झाले आहे.
गिधाड संवर्धनासाठी प्रयत्न
गिधाडांचे अस्तित्व टिकवण्यासाठी बॉम्बे नेचर हिस्ट्री सोसायटी, रॉयल सोसायटी प्रोजेक्ट ऑफ द बर्ड्स यांच्या सल्ल्यानुसार देशातील हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम येथे गिधाड प्रजनन केंद्रे सुरु झाली आहेत. महाराष्ट्रात रायगड, नाशिक, गडचिरोली जिल्ह्यात ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ उभारण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर मावळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील वनराई गिधाड संवर्धनासाठी आदर्श ठरू शकते, असे नांगरे यांनी सांगितले.
त्यांच्या मते –
मावळातील जलाशयाचे खडकाळ किनारे, बंद खाणी व डोंगर पठारे गिधाडांसाठी पूरक अधिवास ठरू शकतात.
२०१७ मध्ये पुण्यात झालेल्या जागतिक पक्षी संमेलनात त्यांच्या निरीक्षणाची दखल घेत परदेशी १३ देशांतील पक्षी निरीक्षकांनी कल्हाट येथील गिधाड वसाहतीला भेट दिली होती.
कल्हाट शिवारात स्थानिक चिंधु आजिवले यांच्या सहकार्याने गिधाडांसाठी मृत जनावरे ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.
पुण्यातील जागतिक ख्यातीचे पक्षी तज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांच्या “ईला फाउंडेशन” व वनविभागाच्या सहकार्याने विशेष कॅमेरे बसवून गिधाडांचा शास्त्रीय अभ्यासही मावळात सुरु आहे.
समाजाचा सहभाग आवश्यक
“गिधाड संवर्धनाची जबाबदारी केवळ निसर्ग अभ्यासक, पक्षी निरीक्षक किंवा वनविभागावर टाकून चालणार नाही. समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे,” असे आवाहन नांगरे यांनी केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, गिधाड संवर्धनाला भरारी मिळाली, तर निसर्गाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल.
अधिक माहितीसाठी पक्षी अभ्यासक अविनाश नांगरे – ९८८१४७१९३० यांच्याशी संपर्क साधावा.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)



















